तरुणभारत ऑनलाइन
देशाच्या नवीन उपराष्ट्रपतींपदासाठी आज निवडणूक पार पडत आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार जगदीप धनखड बिरुद विरोधी पक्षाच्या संयुक्त उमेदवार मार्गारेट अल्वा यांच्यात हि लढत आहे. संख्याबळाचा विचार करता रालोआचे उमेदवार पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल धनखड यांचा विजय निश्चित मानला जात आहे.पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने अल्वा यांच्या नावाच्या घोषणेपूर्वी एकमताचे प्रयत्न झाले नाहीत, असा दावा करून मतदान प्रक्रियेपासून दूर राहण्याची घोषणा केल्याने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरून विरोधी पक्षांमध्येही मतभेद निर्माण झाले आहेत.
८० वर्षीय अल्वा या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या असून, त्यांनी राजस्थानचे राज्यपाल म्हणूनही काम पाहिले आहे. तेलंगणा राष्ट्र समिती, आम आदमी पार्टी आणि झारखंड मुक्ती मोर्चाने अल्वा यांना पाठिंबा जाहीर केला आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनेही अल्वा यांना पाठिंबा दिला आहे.धनखड यांनी शुक्रवारी त्यांच्या निवासस्थानी भाजप खासदारांची भेट घेतली. संसद भवनात शनिवारी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान होणार आहे. त्यानंतर लगेचच मतमोजणी होणार असून, संध्याकाळी उशिरापर्यंत देशाच्या नव्या उपराष्ट्रपतींच्या नावाची घोषणा निवडणूक अधिकाऱ्यांकडून केली जाईल.









