कोल्हापूर / कृष्णात चौगले :
आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये यश संपादनासाठी भाजपने संघटनात्मक बांधणीवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार बुथ बांधणीचे काम युद्धपातळीवर सुरु असून जनतेला पक्षाशी जोडले जात आहे. महायुती सरकारने केलेल्या विकासकामांचा, योजनांचा लेखाजोखा मांडला जात असताना विरोधकांच्या उणिवा, दोष जनतेसमोर सादर केल्या जात आहेत. ‘गाव तेथे बुथ, घर तेथे कार्यकर्ता’ संकल्पना भाजपकडून जोरदारपणे राबवली जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकताच तीन जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांना सभासद नोंदणीचे उद्दीष्ट दिले आहे.
बदलत्या राजकीय घडामोडी आणि प्रचार पद्धतीमध्ये झालेले बदल लक्षात घेऊन भाजपच्या संघटनात्मक रचनेमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अनेक बदल सुचवले आहेत. त्यानुसार कार्यप्रणाली राबवण्याबाबत भाजपचे नेते, म्हसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर सूचना दिल्या आहेत. संघटनात्मक बांधणीमध्ये विशेषतः युवकांना संधी दिली जात आहे. सद्यस्थितीत बुध बांधणीचे काम युद्धपातळीवर सुरु असून सर्वसामान्य जनतेला पक्षाशी जोडले जात आहे. मतदारयादीतील चित्र पाहता युवा व तरूण मतदारांची संख्या लक्षणीय आहे. या युवाशक्तीचा कल निवडणुकीच्या मैदानातील ज्या पक्षाच्या अगर उमेदवाराच्या बाजूने असणार त्या बाजूचा विजय निश्चित होणार आहे. परिणामी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युवा मतदार हा किंगमेकर ठरणार असून राजकारण्यांनीही त्यांना टार्गेट केले आहे. महापालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत समितीची निवडणूक लढवण्यास इच्छूक असलेल्यांनी आपल्या पाठीशी युवकांची फळी उभी करण्यासाठी सुरुवातीपासूनच जोरदार प्रयत्न केले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हायटेक प्रचारयंत्रणेसाठी युवक आवशयक असल्यामुळे त्यांचे स्थान अतिशय महत्वाचे बनले आहे. दरम्यान, महिला मतदारांचे प्रमाण देखील पुरुष मतदारांच्या तुलनेत किरकोळ फरक वगळता बरोबरीतच आहे. त्यामुळे सर्वच पक्षांमध्ये महिला कार्यकर्त्यांनाही अनन्यसाधारण महत्व दिले जात आहे.
- बुथ पातळीवरील कार्यकर्त्यांवर सोपवली मोठी जबाबदारी
ज्येष्ठ व युवा कार्यकर्त्यांचा मेळ घालून पक्षाचे काम सर्व घटकांपर्यंत पोहोवण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. युवकांच्या हातामध्ये नेतृत्व दिले तरच पक्षाचे विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतील, याची नेतृत्वाला जाणीव असल्यामुळे प्रबळ बुथ बांधणीचे सुक्ष्म नियोजन सुरु आहे. थेट तळागाळातील जनतेशी नाळ जोडून त्यांच्यापर्यंत केंद्र, राज्यातील महायुती सरकारने राबवलेल्या योजना सर्वापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी बुध पातळीवरील कार्यकर्त्यांवर सोपवली आहे.
- ऑनलाईन सभासद नोंदणीचा धडाका सुरु
पक्षाचा एखादा कार्यक्रम असला की कार्यालयामध्ये येणारे पाच-पन्नास कार्यकर्ते म्हणजे पक्ष नव्हे. तर जिल्ह्यातील प्रत्येक गावात, शहरातील प्रत्येक वॉर्डात आणि घराघरात आपला कार्यकर्ता असावा, यासाठी भाजपकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. त्यानुसार सभासद नोंदणीसाठी हायटेक फॉ म्र्म्युला वापरून अॅपद्वारे ऑनलाईन जोरदार सभासद नोंदणी सुरू आहे. भाजपकडून बुध बांधणीमध्ये युवक, युवती, महिला, मागासवर्गीय, विद्यार्थी अशा सर्वच स्तरातील सदस्यांचा समावेश करून सर्वसमावेशक संघटना बांधणीवर विशेष भर दिला जात आहे.








