विजयकुमार दळवी,चंदगड
Kolhapur Political News : ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच अत्यंत चुरशीच्या वातावरणात झाल्या असून निवडणुकीतील ईर्षा आता विकासकामात दिसण्याची किंबहुना नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांनी ती कामात दाखविण्याची गरज अधोरेखित झाली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर जवळजवळ एक आठवडा मागे पडला आहे.अभिनंदनाच्या वर्षावात नवनिर्वाचित सदस्य सुखावले आहेत.
याला संपवलं,त्याची जागा त्याला दाखवून दिली,अमक्या माणसांच्या मदतीमुळे हे शक्य झालं अशी बोलणी अजूनही थांबलेली नाहीत. ज्यासाठी आपण निवडून आलो, जो जाहीरनामा जाहीर केला. त्यावर आता गंभीरपणे काम करण्याची गरज आहे. सर्व निवडणुकातील सर्वात अवघड निवडणूक म्हणून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे पाहिले जाते. दिलेले आश्वासन पाळावे लागते. अन्यथा ग्रामसभेत भंबेरी उडवू शकतो. या सर्व शक्यतांचा विचार करून नवनिर्वाचित सरपंच तसेच सदस्यांनी आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. गावचा पाणीपुरवठा, गटार सफाई, फवारणी, ग्रामस्वच्छता, पाणंद रस्ते बांधणी बरोबरच या रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम, शाळा व्यवस्थापन, अशी अनेक विकासकामे करावी लागतात. गोरगरीब माणूस केंद्रबिंदू मानून त्याच्या विकासासाठीचे प्रयत्न ग्रामपंचायतीकडून अपेक्षित असतात.
गावातील वृद्ध,निराधार माणसांना आधार द्यावा लागतो.संजय गांधी निराधार योजनेचा लाभ,अशा गरजू गरिबांना मिळवून देणे, हे सुद्धा ग्रामपंचायतीचे काम आहे. पंधराव्या वित्त आयोगातून विकासकामे राबवत पारदर्शक कारभाराची झलक द्यावी लागते. दर महिन्याला ग्रामपंचायतीने आपला जमा-खर्च नोटीस बोर्डावर अथवा एखादा डिजिटल फलक करून ग्रामपंचायत कार्यालयासमोर लावल्यास ग्रामपंचायतीचा कारभार लोकाभिमुख आहे,हे दिसते.बाजार गावातील ग्रामपंचायतींची अधिक जबाबदारी वाढते.बाजारातून मिळणारा महसूल आणि त्याचा विनियोग हे ग्रामस्थांना समजून घेण्याचा अधिकार आहे,याचे भान ठेवून ग्रामपंचायतीने वाटचाल करणे आवश्यक असते.
ग्रामपंचायतची निवडणूक ज्या ईषेने आपण जिंकतो,तीच ईर्षा विकासकामे राबवताना दिसली पाहिजे.ग्रामपंचायत कोणत्या का गटाची असेना.पण त्यांनी सत्ताधारी लोकप्रतिनिधींकडे विकासकामे मागितली पाहिजेत.विरोधी गटाकडे लोकप्रतिनिधित्व असलं तरीही गटातटाच्या भिंती भेदून सदस्यानी विकासकामांसाठी एकीचे दर्शन घडविले पाहिजे.गावातील छोटे मोठे वाद, भाऊबंदकी सुसंवादाने आणि सामोपचाराने मिटविण्याचे प्रयत्न गावात झाले पाहिजे.सरपंच,तंटामुक्त कमिटी,सदस्य,पोलीस पाटील यांनी वारंवार किमान महिन्यातून दोन वेळा विशेष बैठकांचे आयोजन करून गाव गुण्यागोविंदाने नांदेल,हेही पाहिले पाहिजे.अनेक नवोदित सदस्य पहिल्यांदाच ग्रामपंचायतीमध्ये निवडून आले आहेत.त्यांनीही समाजकार्याला वाहून घ्यावे.तरच गावचा विकास अपेक्षेप्रमाणे होईल.
गावासाठी योगदान दिले पाहिजे…
गावातील दानत असलेल्या मंडळींचा शोध घेऊन केवळ शासकीय अनुदानावर अवलंबून न राहता सामाजिक बांधिलकीतून काही उपक्रम गावात सुरू करून समाजाचे प्रबोधन करणे महत्त्वाचे आहे.त्यातून गावाबद्दलचे प्रेम प्रत्येकाच्या हृदयात निर्माण होईल. गावासाठी आपण काहीतरी योगदान दिले पाहिजे,याची जाणीव मनामनात रुजवायचे काम ग्रामपंचायतीनेच केले पाहिजे. त्यामुळे गाव एका विचाराने चालेलच आणि विकास निधीही कमी पडणार नाही.‘गाव करील ते राव करील काय’ हे पुन्हा एकदा ग्रामपंचायतीने समाजाला दाखवून द्यायला पाहिजे.
Previous Articleमडगावातील पुस्तक प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद
Next Article ऍड. नरेंद्र सावईकर यांच्या पुस्तकाचे 29 रोजी प्रकाशन









