बिहार विधानसभा निवडणुकीत झलक दिसणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
निवडणूक प्रचारासाठी आवश्यक सामग्री तयार करण्यात कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) भूमिका झपाट्याने वाढत असल्यामुळे निवडणूक आयोग त्याचा गैरवापर थांबवण्यासाठी आणि सकारात्मक वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे बनवत आहे. याची झलक चालू वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीत दिसून येणार आहे.
बदलत्या परिस्थितीनुसार निवडणूक आयोगाने वेळोवेळी आपल्या नियमांमध्ये सुधारणा केलेली दिसून येते. त्यानुसार आता एआयच्या प्रभावी वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक आयोग पावले उचलत आहे. विविध राजकीय पक्ष, मीडिया आणि सोशल मीडियाला जनरेटिव्ह एआयशी संबंधित माहिती उघड करावी लागेल. तसेच प्रचारातील एआय वापरण्याचे नियम आणि पद्धती निवडणूक आयोगाकडून स्पष्ट केल्या जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. तसेच बनावट आणि डीपफेक प्रमोशनल व्हिडिओ आणि ऑडिओबाबतही मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जात आहेत. मतदारांना गोंधळात टाकण्यासाठी किंवा त्यांच्या निवडींवर चुकीचा प्रभाव पाडण्यासाठी एआय सामग्रीचा वापर केला जाणार नाही याची खात्री करणे हा यामागचा उद्देश आहे. तसेच, मतदारांच्या गोपनीयतेशी किंवा निवडणुकीच्या निष्पक्षतेशी तडजोड होणार नाही याची खात्री करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे स्पष्ट करण्यात आले.









