लवकरच निवडणुका होणार : सर्वोच्च न्यायालयाची 30 सप्टेंबरपर्यंत मुदत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोग दोन दिवस जम्मू-काश्मीरला भेट देणार आहे. गुऊवार, 8 ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचे विशेष शिष्टमंडळ श्रीनगरला पोहोचणार आहे. सकाळी 11.15 वाजता प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षांसोबत निवडणूक आयोगाची बैठक होणार आहे. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर निवडणूक आयोग 9 ऑगस्ट रोजी दुपारी 2:30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे.
यावषी जूनमध्ये निवडणूक आयोगाने महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील मतदार यादी अद्ययावत करण्याचे आदेश जारी केले होते. हे काम पूर्ण करण्यासाठी 20 ऑगस्टची मुदत देण्यात आली होती. डिसेंबर 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्रशासित प्रदेशात 30 सप्टेंबर 2024 पर्यंत निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. जम्मू काश्मीरला लवकरच राज्याचा दर्जा द्यावा, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
2014 मध्ये शेवटच्या विधानसभा निवडणुका
5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्यात आले. तसेच राज्य जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागले गेले. याचदरम्यान जम्मू काश्मीरमध्ये दिल्ली आणि पुद्दुचेरीप्रमाणे नायब राज्यपालांची सत्ता असेल, पण जनता विधानसभेच्या अंतर्गत मुख्यमंत्रीही निवडेल, असेही स्पष्ट करण्यात आले होते. त्यापूर्वी 2014 मध्ये जम्मू काश्मीरमध्ये शेवटच्या निवडणुका झाल्या होत्या. मात्र, 2018 मध्ये भाजपने पीडीपीसोबतची युती तोडल्यामुळे भाजप-पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे युतीचे सरकार कोसळले होते. अलिकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जम्मू-काश्मीरमधील 5 जागांपैकी जम्मू आणि उधमपूरच्या जागा भाजपच्या खात्यात गेल्या. जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सला येथे 2 जागा मिळाल्या. तर बारामुल्लाच्या जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाले.
सर्वोच्च न्यायालयाने डिसेंबर 2023 मध्ये निवडणूक आयोगाला जम्मू काश्मीरमध्ये सप्टेंबर 2024 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही एका मुलाखतीत जम्मू काश्मीरमध्ये 30 सप्टेंबरपूर्वी विधानसभा निवडणुका होणार असल्याचे सांगितले होते.









