दोन मतदारपत्रे असल्याचे प्रकरण, काँग्रेसची कोंडी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काँग्रेसचे प्रवक्ते आणि राहुल गांधी यांच्या जवळचे नेते पवन खेडा यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने नोटीस पाठविली आहे. एकीकडे राहुल गांधी निवडणूक आयोगावर मतचोरीचा आरोप करत असताना, त्यांचेच निकटचे सहकारी पवन खेडा यांच्याकडे दोन मतदारपत्रे असल्याचा पर्दाफाश भारतीय जनता पक्षाने दोन दिवसांपूर्वी केला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने आरोपाची पडताळणी करुन पवन खेडा यांना दोन मतदारपत्रे बाळगल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस दिली. लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या अनुसार दोन मतदारपत्रे बाळगणे आणि एकापेक्षा अधिक मतदान केंद्रांवर मतदार म्हणून नावे नोंदविणे हा शिक्षापात्र गुन्हा आहे. आपल्याकडे दोन मतदान ओळखपत्रे आहेत, असे आढळले आहे. तेव्हा आपल्यावर कायदेशीर कारवाई का करु नये, याची कारणे स्पष्ट करावीत, अशी नोटीस पवन खेडा यांना देण्यात आली असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.
मालवीय यांनी केला गौप्यस्फोट
पवन खेडा यांच्याकडे दोन मतदार ओळखपत्रे आहेत, हा गौप्यस्फोट भारतीय जनता पक्षाच्या माहिती तंत्रज्ञान कक्षाचे प्रमुख अमित मालवीय यांनी सोमवारी केला आहे. मात्र, पवन खेडा यांनी हा आरोप नाकारला होता. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविषयी शंका उपस्थित केली होती.
राहुल गांधी यांनी, लवकरच आपण हैड्रोजन बाँबचा स्फोट करणार आहोत, अशी घोषणा केली होती. त्या पार्श्वभूमीवर पवन खेडा यांच्या दोन मतदार ओळखपत्रांची चर्चा होत आहे. राहुल गांधी यांनी बिहारमध्ये मतदारसूचीच्या गोंधळाला आरोप करुन व्होटर अधिकार यात्रेचे आयोजन केले होते. त्या यात्रेची समाप्ती 1 सप्टेंबरला करण्यात आली होती. त्यानंतर पवन खेडा यांच्या दोन ओळखपत्रांचे प्रकरण बाहेर आले.
काय कारवाई होणार ?
पवन खेडा यांच्याकडे दोन मतदार ओळखपत्रे आहेत असे सिद्ध झाल्यास निवडणूक आयोग त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करु शकतो. त्यांची मतदार ओळखपत्रे रद्द करण्याचा अधिकार आयोगाला आहे. तसेच अशा दोन काडै असणाऱ्या व्यक्तीला निवडणूक लढविण्यापासून कायमचे वंचित केले जाऊ शकते.









