3 डिसेंबरला मतदानयंत्रांसंबंधात चर्चा होणे शक्य
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
` 3 डिसेंबरला ही चर्चा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतगणनेनंतर काँग्रेसने आणि इतर विरोधी पक्षांनी मतदान यंत्रांमध्ये घोटाळा असल्याचा आरोप केला होता. या पक्षाने निवडणूक आयोगाला अनेक आक्षेप कळविले होते. या आक्षेपांचे निराकरण करण्यासाठी आयोगाने या चर्चेचे आयोजन केले आहे.
मतदान यंत्रे पूर्णत: निर्दोष असून त्यांच्यात कोणताही घोळ होणे अशक्य आहे, असे स्पष्टीकरण केंद्रीय निवडणूक आयोगाने यापूर्वीच दिले आहे. या यंत्रांमध्ये कोणतेही प्रोग्रॅमिंग करता येत नाही. तसेच ती रिमोट कंट्रोल पद्धतीने चालविता येत नाहीत. एका उमेदवाराला पडलेली मते दुसऱ्या उमेदवारला जाण्याचे प्रकार या मतदानयंत्रात घडत नाहीत. विरोधी पक्षांनी या संबंधात केलेले आरोप केवळ गैरसमजुतीवर आधारित आहेत, अशी टिप्पणी अनेक तज्ञांनीही केली आहे. निवडणूक आयोगाने काँग्रेसला दिलेल्या आमंत्रणावर अद्याप त्या पक्षाने त्याची भूमिका स्पष्ट केलेली नाही. तथापि, ही चर्चा होईल, अशी शक्यता आहे.
भाजपकडून विरोधकांची खिल्ली
काही वर्षांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांसाठी ‘हॅकथॉन’ नामक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या यंत्रामध्ये घोटाळा करता येतो हे कोणत्याही राजकीय पक्षाने निवडणूक आयोगाच्या तज्ञांसमक्ष सप्रमाण सिद्ध करुन दाखवावे, असे आवाहन आयोगाने दिले होते. तथापि, कोणत्याही राजकीय पक्षाने हे आव्हान स्वीकारण्याचे धाडस दाखविले नाही. मात्र, कोणत्याही निवडणुकीत विरोधी पक्षांचा पराभव झाला की मतदान यंत्रांवर संशय व्यक्त केला जातो. मात्र, विरोधी पक्षांचा विजय झाला की मतदान यंत्रांसंबंधी कोणतीही तक्रार केली जात नाही. त्यामुळे या यंत्रांसंबंधी विरोधकांची भूमिका हास्यास्पद आहे, अशी खोचक टिप्पणी यासंदर्भात भारतीय जनता पक्षाने केली आहे.









