हजारो बोगस मतदार जोडल्याचा राहुल गांधींचा दावा : आयोगाने आरोप फेटाळले
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
बिहारमधील मतदारयादीच्या विशेष पडताळणीविरोधात निदर्शने सुरू असताना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी कर्नाटकातही निवडणूक आयोगाने घोळ घातल्याचा दावा केला आहे. कर्नाटकात हजारो बोगस मतदारांची नावे जोडण्यात आल्याचा आरोप राहुल यांनी गुरुवारी संसदेबाहेर बोलताना केला. मात्र, या आरोपांनंतर निवडणूक आयोगानेही राहुल गांधी यांना सडेतोड प्रत्युत्तर देत सर्व आरोप निराधार असल्याचे स्पष्ट केले. तसेच आपल्याकडे सबळ पुरावे असतील तर यापूर्वी तक्रार का केली नाही? असा प्रश्नही उपस्थित केला.
कर्नाटकच्या एका जागेवर निवडणूक आयोगाने फसवणूक केली. आमच्याकडे याचे 100 टक्के पुरावे आहेत. त्याच मतदारसंघात 50, 60 आणि 65 वर्षांच्या हजारो नवीन मतदारांना यादीत समाविष्ट करण्यात आले असून 18 वर्षांवरील मतदारांना यादीतून वगळण्यात आल्याचे राहुल गांधी म्हणाले. ‘आम्हाला एका मतदारसंघातील पाहणीत बरीच अनियमितता आढळली. मला खात्री आहे की प्रत्येक जागेवर असेच नाटक सुरू आहे. मी निवडणूक आयोगाला एक संदेश देऊ इच्छितो. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही यातून सुटाल, तर तो तुमचा गैरसमज आहे. आम्ही तुम्हाला यातून सुटू देणार नाही.’ असा इशाराही राहुल गांधींनी दिला.
आधी तक्रार का केली नाही? : आयोग
राहुल गांधी यांच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने भाष्य केले आहे. लोकसभा निवडणूक-2024 बाबत कर्नाटकात एकूण 10 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या, परंतु त्यापैकी एकही याचिका निवडणूक पराभूत झालेल्या काँग्रेस उमेदवाराने दाखल केली नाही, असे सत्य आयोगाने निदर्शनास आणून दिले. तसेच ‘काँग्रेस लोकप्रतिनिधी कायदा 1950 च्या कलम 24 अंतर्गत तक्रार करू शकली असती. परंतु डीएम किंवा सीईओंकडे आजपर्यंत एकही अपील दाखल करण्यात आले नाही. असे निराधार आणि धमकीचे आरोप का केले जात आहेत आणि तेही आता?’ असा प्रश्न आयोगाने उपस्थित केला आहे.









