उद्या मतदान, रविवारी मतमोजणी
फोंडा : फोंडा नगरपालिकेचा निवडणुक प्रचार काल बुधवारी सायंकाळी संपुष्टात आला. शुक्रवार 5 रोजी पालिकेच्या 15 पैकी 13 प्रभागांसाठी मतदान होणार असून रविवार 7 रोजी तिस्क फोंडा येथील सरकारी इमारतीच्या सभागृहात मतमोजणी होणार आहे. एकूण 15 प्रभागांपैकी खडपाबांध प्रभाग 7 व दुर्गाभाट सिल्वानगर प्रभाग 13 मधून भाजपा पुरस्कृत फोंडा नागरिक समितीचे विश्वनाथ दळवी व विद्या पुनाळेकर हे बिनविरोध निवडणून आले आहेत. त्यामुळे तेरा प्रभागांमध्ये मतदान होणार आहे. तेरा प्रभागांमधून 43 उमेदवार रिंगणात आहेत. ही निवडणूक पक्ष पातळीवर किंवा राजकीय पक्षांच्या चिन्हावर होत नसली तरी मगो व भाजपाने आपले पॅनल उभे केले आहेत. काँग्रेस पक्षाने काही मोजक्याच प्रभागांमध्ये समर्थक उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. भाजपा पुरस्कृत फोंडा नागरिक समिती या पॅनलमधून सर्व तेराही प्रभागांत तर मगो रायझिंग फोंडा पॅनलचे बारा प्रभागामधून उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेस पक्षाने सहा प्रभागांमध्ये उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. बहुतेक प्रभागांमध्ये तिरंगी व दुरंगी लढती होणार आहेत. मतदान प्रक्रिया बॅलट पेपरद्वारे होणार आहे. रविवार 7 रोजी सकाळी 9 वा. पासून मतमोजणीला सुऊवात होणार असून दुपारपर्यंत सर्व प्रभागांचे निकाल जाहीर होणार आहेत.









