नगरसेवकांनी कापला मनपा कार्यालयासमोर केक : प्रशासकांच्या कक्षातून नगरसेवकांना बाहेर हकलण्याचा प्रकार, आयुक्तांच्या वर्तणुकीबद्दल नाराजी

प्रतिनिधी /बेळगाव
महापालिका निवडणुकीला वर्षपूर्ती झाली. पण महापौर-उपमहापौर निवड झाली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ वर्षपूर्ती सोहळय़ाचे नियोजन नगरसेवकांनी केले होते. मात्र प्रशासकांच्या कक्षातून नगरसेवकांना बाहेर हकलण्याचा प्रकार महापालिका आयुक्तांनी केला. या ठिकाणी बसण्याचा तुम्हाला कोणताच अधिकार नाही, असे सांगून बाहेर जाण्याची सूचना केली. परिणामी संतापलेल्या नगरसेवकांनी आम्ही नगरसेवक आहोत की नाही? असा प्रश्न उपस्थित केला.
महापालिका आयुक्तांच्या वर्तणुकीबद्दल नाराजी व्यक्त करून महापालिका कार्यालयासमोर केक कापून प्रशासनाचा निषेध नोंदविला. त्यामुळे मनपा कार्यालयासमोर गोंधळ झाल्याने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. महापालिका सभागृहाची मुदत साडेतीन वर्षांपूर्वी संपली होती. अडीच वर्षांनंतर महापालिका निवडणुका घेण्यात आल्या. निवडणूक होऊन वर्ष झाले असून निवडणुकीचा निकाल दि. 6 सप्टेंबर 2021 रोजी लागला होता. 58 नगरसेवकांची निवड झाल्यानंतर त्यांना नगरसेवक म्हणून प्रमाणपत्र देण्यात आले होते. महापालिका निवडणूक होऊन वर्षपूर्ती झाली, पण महापौर-उपमहापौर निवड रखडली असल्याने सभागृहाची स्थापना झाली नाही. परिणामी नगरसेवकांना अधिकार प्राप्त झाले नाहीत. नागरिकांच्या समस्यांचे निवारण करताना नगरसेवकांना अनेक अडचणी निर्माण होत आहेत.
नगरसेवक म्हणून निवड करण्यात आल्याने नागरिक नगरसेवकांकडे तक्रारी करीत आहेत. या तक्रारींचे निवारण करण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱयांना सांगितले असता त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. वर्षानंतरही नगरसेवकांना अधिकार प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे शहरवासियांना रस्ते, स्वच्छता, पथदीप आणि अन्य समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सभागृहाची स्थापना करण्यासाठी महापौर-उपमहापौर निवड तातडीने करण्यात यावी, अशा विनंतीचे निवेदन महापालिका आयुक्तांसह प्रादेशिक आयुक्तांना देण्यात आले होते. पण याबाबत कोणतीच कार्यवाही झाली नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मनपातील अपक्ष, एमआयएम आणि काँग्रेस पक्षाच्या 27 नगरसेवकांनी महापालिकेत वर्षपूर्ती सोहळय़ाचे नियोजन केले होते. यानिमित्त केक कापण्याचा विचार चालविला होता. याकरिता सर्व नगरसेवक महापालिकेत जमा होत होते. काही नगरसेवक व नगरसेविका प्रशासकांच्या कक्षात बसले होते. त्यामुळे महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांनी त्यांना बाहेर जाण्याची सूचना केली.
प्रशासनाला जाग येणार का?
आयुक्तांच्या उद्धट वर्तणुकीबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच महापालिका कार्यालयासमोर दुचाकी वाहनांवर केक कापून वर्षपूर्ती सोहळा साजरा केला. निवडणूक होऊन वर्ष झाले तरी सभागृह अस्तित्वात नसल्याने त्या निषेधार्थ हा सोहळा आयोजित करून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न नगरसेवकांनी केला. त्यामुळे महापौर-उपमहापौर निवडणूक घेण्याच्यादृष्टीने आता तरी प्रशासनाला जाग येणार का? याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.
आम्ही नगरसेवक आहोत की नाही?
कोणत्याही प्रकारचा सोहळा किंवा कार्यक्रम मनपात साजरा करण्याचा तुम्हाला अधिकार नाही, असे आयुक्तांनी सांगून प्रशासकांच्या कक्षाबाहेर जाण्यासाठी सातत्याने सूचना केली. त्यामुळे नगरसेवक आणि महापालिका आयुक्तांमध्ये वादावादीही झाली. तर पोलीस प्रशासनाला सूचना देऊन नगरसेवकांना बाहेर काढण्यात आले. त्यामुळे संतापलेल्या नगरसेवकांनी आम्ही लोकनियुक्त सदस्य असून लोकशाहीमार्गाने आमची निवड झाली आहे. त्यामुळे आम्ही नगरसेवक आहोत की नाही? हे प्रथम सांगा असा मुद्दा उपस्थित केला.









