वृद्धाश्र्रम कर्मचाऱ्यांसह वृद्धांची सेवा करणाऱ्या संस्थांसाठी विशेष उपक्रम : केंद्र सरकारचा पुढाकार
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
देशातील वृद्ध लोकांच्या वाढत्या संख्येमुळे त्यांच्याशी संबंधित सुविधांचा विस्तार करण्याची आणि त्यांच्या काळजीची संरचना मजबूत करण्याची तयारी केंद्र सरकार करत आहे. सध्या केंद्र सरकारने या दिशेने आणखी एक मोठा पुढाकार घेत वृद्धाश्र्रम आणि वृद्धांच्या चळवळीशी संबंधित संस्थांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या काळजीसाठी विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासोबतच सर्व जिल्हा ऊग्णालयांमध्ये वृद्धांच्या उपचारासाठी स्वतंत्र केअर युनिट तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. वृद्धांच्या वाढत्या संख्येमुळे त्यांच्या काळजीबाबत कोणत्याही समस्या उद्भवू नयेत यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
वृद्धांची सेवा करणाऱ्या कर्मचारी किंवा संस्थाना प्रशिक्षण देण्याच्या निर्णयामुळे वृद्धाश्र्रमांचा दर्जा तर सुधारेलच, त्याशिवाय वृद्धांच्या काळजीबाबत लोकांमध्ये जागरुकताही वाढेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने या संदर्भात वृद्धांची काळजी घेण्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ञ आणि संस्थांना आमंत्रित केले आहे. हे प्रशिक्षण वर्ग या महिन्याच्या अखेरीस सुरू होऊ शकतात, असे केंद्रीय मंत्रालयीन सूत्रांकडून सांगण्यात आले.
सध्या देशातील कोणत्याही वृद्धाश्र्रमात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वृद्धांची काळजी घेण्यासंदर्भात कोणतेही प्रशिक्षण दिले जात नाही. अशा स्थितीत वयोमानानुसार वृद्धांना होणाऱ्या समस्यांबाबत ते अनभिज्ञ असतात. त्यामुळे केंद्र सरकारने संबंधित कर्मचारी आणि संस्थांना प्रशिक्षण देण्याचे निश्चित केले आहे. देशात वृद्धांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या देशात वृद्धांची संख्या सुमारे 15 कोटी आहे, तर 2026 पर्यंत ती 18 कोटींहून अधिक होण्याची अपेक्षा आहे. वृद्धांची वाढती संख्या लक्षात घेऊन केंद्र सरकारने देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये किमान एक वृद्धाश्र्रम स्थापन करण्यासह अनेक मोठी पावले उचलली आहेत. सध्या देशातील सुमारे 440 जिल्ह्यांमध्ये सुमारे 536 वृद्धाश्र्रम आहेत. काही जिल्ह्यांमध्ये ही संख्या जास्त असली तरी जवळपास 220 जिल्ह्यांमध्ये एकही वृद्धाश्र्रम नसल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे.









