मालकीहक्काच्या मालमत्ता असूनही परावलंबी : सुनेकडून, मुलाकडून वृद्ध महिलांवर अत्याचार,नातवंडांना भेटण्यासाठी पहावी लागते वाट,प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा फोनवर बोलण्यास प्राधान्य,स्मार्टफोनबाबत वृद्ध महिला अजूनही अनभिज्ञ
पणजी : दरवर्षी 15 जून हा ज्येष्ठ नागरिक छळ जागरूकता दिन म्हणून जागतिक पातळीवर साजरा केला जातो. त्यानिमित्त हेल्पएज इंडियातर्फे वडिलधाऱ्यांना समाजात तसेच कुटुंबात कोणत्या समस्यांना, अत्याचारांना सामोरे जावे लागते याबाबत सर्वेक्षण करून त्यावर तोडगा काढण्यात यावा यासाठी पावले उचलत आहेत. यंदाही महिला ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ‘महिला आणि म्हातारपण’: दुर्लक्षित की सक्षम’ या विषयावर आधारित सर्वेक्षणात्मक अहवाल हेल्पएज इंडियातर्फे प्रकाशित करण्यात आला आहे. देशातील 22 शहरात 60 ते 90 वर्षे या वयोगटातील नागरिकांचे हेल्पऐज इंडियातर्फे सर्वेक्षण करण्यात आले आहे. गोव्यातसुद्धा हेल्पएज इंडियातर्फे सर्वेक्षण करण्यात आले. यात सुमारे 59 टक्के ज्येष्ठ महिलांना नोकरी करण्याजोगे वातावरण मिळाले नसल्याने किंवा घरगुती जबाबदारीमुळे त्यांना नोकरी सोडावी लागली. महिलांना अजूनही आपल्या घरातील जबाबदारी सांभाळून नोकरी करावी लागते. परंतु त्यांना अजूनपर्यंत घरात किंवा नोकरीवर सहकार्य करणारे असे वातावरण कधीच मिळत नाही. गोव्यात आपल्या कुटुंबासमवेत राहणाऱ्या ज्येष्ठ महिलांची टक्केवारी काहीप्रमाणात जास्त आहे. ज्यात 74 टक्के आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यातरी अजूनही आपल्या गरजा पुरविण्याकरिता त्या आपल्या मुलांवर पैशांसाठी अवलंबून आहेत. 35 टक्के ज्येष्ठ महिला या आपल्या गरजा पूर्ण करतात तर 9 टक्के अजूनही नोकरी करून पैसा मिळवत आहेत, असे या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे.
मालकीहक्काच्या मालमत्ता असूनही परावलंबी
विधवा असलेल्यांकडे त्यांच्या मालकीहक्काच्या मालमत्ता आहेत. यात 38 टक्के ज्येष्ठ महिलांकडे स्वत:च्या मालकीची मालमत्ता असून 62 टक्के ज्येष्ठ महिला या अजूनही दुसऱ्यांवर अवलंबून आहेत. या सर्वात महत्त्वाचे म्हणजे 77 टक्के ज्येष्ठ महिलांकडे अजूनही रोजगार नाही. काही वर्षे नोकरी केल्यानंतर सोडून देणाऱ्यांमध्ये किंवा कधीच नोकरी न करण्याऱ्यांची नोंद या टक्केवारीत करण्यात आली आहे. यामागील कारण म्हणजे सुमारे 59 टक्के ज्येष्ठ महिलांना नोकरी करण्याजोगे वातावरण मिळाले नाही तर काहींना जबाबदारीमुळे नोकरी सोडावी लागली आहे. याचबरोबर म्हातारपण म्हटले की आजार आले. त्यात 51 टक्के ज्येष्ठ महिलांनी कुठल्याही प्रकारचा जुनाट आजार नसल्याचे नमूद केले आहे तर 66 टक्के महिला नियमित उपचार घेत असल्याचे दिसून आले आहे.
नातवंडांना भेटण्यासाठी पहावी लागते वाट
सध्याच्या आधुनिक युगात पुरूष आणि महिला हे दोघेही नोकरीनिमित्त घराबाहेर असतात. त्यामुळे घरातील मुलांबाळांना पाहण्याकरिता घरातील जाणत्यांकडे जबाबदारी दिली जाते. परंतु कधीकधी ही जबाबदारी त्यांच्यासाठी एक ओझं वाटते. गोव्यात 43 टक्के वृद्ध महिला काळजी घेण्याच्या जबाबदारी योग्यरित्या हाताळतात. आजच्या धकाधकीच्या युगात कुटुंबाला वेळ देणे हा मोठा प्रश्न प्रत्येकाला पडतो. त्यात आपल्या आईवडिलांना वेळ देण्यासाठी कसरत करावी लागते. याशिवाय आपल्या नातवंडांना भेटण्यासाठी आजी आजोबांना वाट पहावी लागते. नोकरीनिमित्त बाहेरगावी असल्यामुळे विभक्त कुटुंबेही हल्लीच्या काळात दिसून येतात. नोकरी किंवा व्यवसायामुळे वृद्ध आईवडिलांना आपल्या मुलांना पाहण्यासाठीसुद्धा आठवडे, महिने वाट पाहावी लागते. गोव्यातसुद्धा हीच परिस्थिती सर्वेक्षणात दिसून आली आहे.
प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा फोनवर बोलण्यास अधिक प्राधान्य
गोव्यातील परिस्थिती पाहता महिन्यातून एकदा आईला भेटण्याची टक्केवारी 40 टक्के आहे जी वेदनादायी गोष्ट आहे. आपल्या कुटुंबाला समोरासमोर भेटण्यापेक्षा फोनद्वारे बोलण्यावर जास्त प्राधान्य सध्या दिले जाते. 96 टक्के वृद्ध महिला या फोनद्वारे आपल्या कुटुंबियाशी संपर्क ठेवतात तर 57 टक्केच वृद्ध महिला आपल्या कुटुंबियांशी समोरासमोर गाठभेट करतात, असे या सर्वेक्षणात दिसून आले.
स्मार्टफोनबाबत वृद्ध महिला अजूनही अनभिज्ञ
आताच्या काळात स्मार्टफोनची चलती आहे. त्यामुळे त्यात सोशल मीडिया हा आलाच. परंतु हाच स्मार्टफोन वृद्धांसाठी समस्येचे कारण बनत आहे. स्मार्टफोन किंवा सोशल मीडियाची पूर्णत: माहिती नसल्याने तो कसा वापरावा याबाबत अनभिज्ञ आहेत. गोव्यात स्मार्टफोनचा वापर 42 टक्के वृद्ध महिला फक्त कॉलिंगसाठी वापरतात, तर 19 टक्के युट्यूबवर व्हिडिओ पाहण्यासाठी वापर करतात. बँक ट्रान्सझेक्शन, पॅमेरा यासारख्या गोष्टींबाबत अजूनही वृद्ध अनभिज्ञ आहेत. विशेष म्हणजे स्मार्टफोन ही वस्तु वृद्धांसाठी नाहीच अशाप्रकारचे वर्तन कुटुंबात केले जाते. गोव्यात एकूण 63 टक्के वृद्ध महिलांकडे स्मार्टफोन नाहीत तर 86 टक्के वृद्ध महिलांना सोशल मीडिया काय असते, याबाबत माहिती नसल्याचे दिसून आले आहे.
सुनेकडून, मुलाकडून होतोय वृद्ध महिलांवर अत्याचार
ज्येष्ठ नागरिकांवर होणारा अत्याचार हा भारतीय कुटुंबामध्ये संवेदनशील विषय असून हा अहवाल समाजात अजूनही ज्येष्ठ नागरिकांसोबत गैरवर्तणूक व अत्याचाराच्या घटना घडत असल्याचे स्पष्ट करतो. आजही गोमंतकीय कुटुंबात ज्येष्ठ नागरिकांना अनादरचा सामना करावा लागतो. हे अत्याचार नातेवाईक, सूनेकडून व मुलांकडून जास्त प्रमाणात होतात. अपमान, मारहाण याची टक्केवारी गोव्यासारख्या छोट्या राज्यात पाहिली तर ती चिंताजनकच ठरेल. गोमंतकीय कुटुंबात 53 टक्के ज्येष्ठ महिलांना अपमानाचा, तर 20 टक्के वृद्ध महिलांना शारीरिक शोषणाचा सामना करावा लागत आहे. तसेच सध्या 32 टक्के वृद्ध महिला अत्याचाराला सामोरी गेल्या आहेत. अत्याचाराला वाचा फोडण्याकरितासुद्धा गोव्यात उपलब्ध असलेल्या सुविधांबाबतची जागृती कमी प्रमाणात दिसून येते. याशिवाय सरकारतर्फे ज्या योजना आहेत त्याबाबतसुद्धा नातेवाईकांकडून किंवा शेजाऱ्यांकडून माहिती दिली जाते. सरकारने ज्येष्ठांसाठी विशेष योजना तयार कराव्यात अशा प्रकारची मागणीसुद्धा ज्येष्ठ महिलांमार्फत करण्यात आली आहे. वृद्ध महिलांना सक्षम बनविण्याकरिता सरकारी पातळीवर तसेच सामाजिकदृष्ट्या लक्ष देणे गरजेचे आहे. ज्येष्ठांवर होणारे अत्याचार प्रतिबंध आणणेसुद्धा काळाची गरज आहे.
ज्येष्ठांच्या समस्यानिवारणासाठी आयोग होणे आवश्यक
ज्येष्ठ नागरिकांवर अत्याचार होतच आहेत. परंतु त्याला वाचा फुटत नाही आणि हेच अत्याचार आपलीच माणसे करीत आहेत. आजही मालमत्तेसाठी, घरासाठी ज्येष्ठ नागरिकांना लढा द्यावा लागत आहे. कुटुंबातील माणसेच ज्येष्ठांना त्रास देत आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्याकरिता गोव्यात आयोग होणे आवश्यक आहे.
– राजन घाटे, ज्येष्ठ नागरिक संरक्षक व सामाजिक कार्यकर्ता
सिनीअर सिटिझन असोसिएशनच्या व्यासपीठावर यावे
अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांनी विशेषत: महिलांनी सिनिअर सिटीझन असोसिएशनच्या व्यासपीठावर येणे आवश्यक आहे.
-दत्तप्रसाद पावसकर, हेल्पएज इंडिया गोवा प्रमुख









