सातारा :
मंगळवार तळे परिसरात तुळजाभवानी मंदिराच्या समोरुन दि. 1 जुन रोजी सायंकाळी 5.10 वाजता प्रमोद नारायण नातू (वय 65 रा. मंगळवार पेठ) यांना दोन अनोळखी व्यक्तींनी पोलीस असल्याची बतावणी करुन त्यांच्याकडून 70 हजार रुपयांचे दागिने काढून घेवून फसवणूक केल्याचा गुन्हा शाहुपूरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, प्रमोद नातू हे तुळजाभवानी मंदिरापासून चालत निघाले होते. तेव्हा दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आल्या. त्यांनी आम्ही पोलीस आहोत, असे सांगून त्यांच्याकडील 60 हजार रुपयांचे हातातील वेंडण व सोन्याच्या अंगठ्याची मागणी केली. त्यांनी ते दागिने दोघांना दिले. सर्व दागिने घेवून तेथून दोघांनी पोबारा केला. त्यावरुन आपली फसवणूक झाल्याचा गुन्हा शाहुपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून याचा तपास हवालदार भोसले हे करत आहेत.








