कोल्हापूर :
पोलीस असल्याची बतावणी करुन वृद्धाचे तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने दोघा भामट्यांनी लंपास केले. सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मार्केट यार्ड परिसरात ही घटना घडली. याबाबतची फिर्याद चंद्रप्रकाश उगमराज मांडोत (वय 61 रा. टाकाळा चौक, राजाराम रोड) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली. दुचाकीवरुन आलेल्या 20 ते 25 वयोगटातील दोन भामट्यांनी ही चोरी केल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चंद्रप्रकाश मांडोत यांचे गांधीनगर येथे साडीचे दुकान आहे. सोमवारी सकाळी ते घरातून दुचाकीवरुन दुकानाकडे निघाले होते. 10 वाजण्याच्या सुमारास ते मार्केट यार्ड कमानीजवळ आले असता, दोघे जण दुचाकीवरुन त्यांच्या जवळ आले. त्यांनी चंद्रप्रकाश मांडोत यांना थांबवून या परिसरात लुटमारीच्या घटना वाढल्या आहेत. आम्ही पोलीस असून, गस्त घालत असल्याचे सांगितले. तसेच तुमच्या जवळील दागिने कागदात बांधून ठेवा असे सांगून चंद्रप्रकाश यांच्याकडील 1 तोळ्याची अंगठी, 2 तोळ्याची चेन कागदात बांधून ठेवण्यास सांगितले. यापैकी एकाने मांडोत यांना कागदात दागिने ठेवण्यास मदत करण्याच्या बहाण्याने दागिन्यांची बदली करुन त्या जागी छोटा दगड कागदात बांधून मांडोत यांच्याकडे दिला. मांडोत काही अंतरावर गेल्यावर त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी याबाबतची माहिती शाहूपुरी पोलिसांना दिली. यानंतर शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला.
- 20 ते 25 वयोगटातील भामटे
काळ्या रंगाच्या दुचाकीवरुन 20 ते 25 वयोगटातील दोन इसम मांडोत यांच्याजवळ आले होते. त्यापैकी पुढे बसलेल्या तरुणाने हेल्मेट परिधान केले होते. तसेच त्यांच्या अंगावर निळ्या रंगाचा फुल शर्ट, निळ्या रंगाची जिन्स पँट घातली होती. तर दुसऱ्या तरुणाने राखाडी रंगाची टोपी, पिवळ्या रंगाचा फुल शर्ट, निळ्या रंगाची जिन्स पॅट घातली होती.








