राधानगरी-कोल्हापूर एसटी बसची जोरदार धडक
वाशी : रोडवर कोल्हापूर-राधानगरी कोथळी (ता. करवीर) येथील एस. टी. स्टँडसमोर एसटी च्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. विठ्ठल कृष्णात लांडगे वय ७० रा. वाशी (ता. करवीर) असे मृताचे नाव आहे. ही घटना शनिवारी रात्री सुमारे आठच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री आठच्या सुमारास भोगावतीकडून कोल्हापूरकडे जाणारी एसटी बस कोथळी येथील एसटी स्टँडवर आली. यावेळी विठ्ठल लांडगे हे कोथळी येथील पाहुण्यांच्या गावी दिवाळी सणानिमित्त दोन दिवस राहण्यासाठी आले होते.
यावेळी ते रात्री आठ वाजता एसटी स्टैंड परिसरात जेवण करून फेरफटका मारण्यासाठी गेले होते. दरम्यान एसटी स्टँडवर समोरून आलेल्या एसटीने त्यांना जोरात धडक दिल्याने या धडकेत विठ्ठल लांडगे याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
या धडकेच्या मोठ्या आवाजाने स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन तत्काळ त्यांना उपचारासाठी दवाखान्यात हलविले; मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. सीपीआरमध्ये शिवविच्छेदन करण्यात आले. अधिक तपास पोलिस करत आहेत.








