सांगली :
शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाजवळ असणाऱ्या मराठा समाज भवन समोर रविवारी सकाळी व्यायाम करुन दुचाकीवरुन घरी परतणाऱ्या वृद्धाचा अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. एसटी आणि दुचाकी असा हा अपघात झाला. अपघातात दुचाकीस्वार मेहबूब फकरुद्दीन शेख (वय ६५ रा. लतीफ पठाण कॉलनी, रमामाता नगर सांगली) यांचा मृत्यू झाला. हा अपघात सकाळी पावणेसातच्या सुमारास झाला. त्यामुळे पुन्हा एकदा सिव्हील हॉस्पिटल रोड धोकादायक बनला आहे हे सिद्ध झाले आहे.
मिरजेकडून सांगली बसस्थानकाकडे येणाऱ्या एसटीने अपघातग्रस्त एसटी दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार शेख यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने वसंतदादा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान या अपघातानंतर एसटी चालकाचे पूर्ण नियंत्रण सुटले आणि एसटी समोरील झाडावर जाऊन आदळली. यामध्ये एसटीचे मोठे नुकसान झाले आहे तर एसटी चालकासही लागले आहे. या अपघातानंतर बघ्यांची मोठी अपघाताबाबत गर्दी झाली होती. तसेच या ठिकाणी रस्ता ब्लॉक झाला होता. पोलीस आणि नागरिकांनी इतर वाहनांना रस्ता करून दिला आणि जवळपास एक तासाने रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली. मयत मेहबूब शेख यांच्या मुलाने एसटी चालकविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सांगली शहर पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंभार हे तपास करत आहेत.
- मयत शेख चालण्याच्या व्यायामासाठी गाडीवरुन आले होते
मयत शेख हे दररोज चालण्याच्या व्यायामासाठी घरातून दुचाकीवरून स्टेडियममध्ये येतात आणि चालून झाले की थोडा व्यायाम करुन ते दुचाकीवरून घरी निघून जातात. हा त्याचा नित्यक्रम होता. ते सुतार काम करत होते. आज सकाळीही ते व्यायाम करून आपल्या बाजूने घरी जात असताना एसटीने त्यांना उडविले आणि ते मयत झाले.
- याच रस्त्यावर युवती ठार झाली होती
पंधरा दिवसापूर्वी याच रस्त्यावर एसटीखाली येऊन युवती ठार झाली होती. त्यानंतर हा रस्ता अतिक्रमण मुक्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत होती. पण याठिकाणी अतिक्रमण मोहीम राबविली नाही. पुन्हा याच रस्त्यावर त्या अपघाताच्या ठिकाणापासून अवघ्या १०० मीटरवर हा अपघात झाला आहे. आता तरी हा रस्ता अतिक्रमण मुक्त होणार का असा सवाल नागरिकांतून होत आहे








