धामणे शिवारातील घटना : जखमीवर हुबळीत उपचार
प्रतिनिधी/ बेळगाव
शेतात काम करणाऱ्या वृद्धेवर हल्ला करण्यात आला आहे. शनिवारी दुपारी धामणे, ता. बेळगाव येथे ही घटना घडली आहे. हल्ल्यानंतर वृद्धेच्या अंगावरील दागिने पळविल्याचे सांगण्यात आले आहे. एका महिलेने हे कृत्य केले असून गंभीर जखमी झालेल्या वृद्धेला उपचारासाठी हुबळी येथील किम्स इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
विमलाबाई बाळेकुंद्री (वय 71) रा. धामणे असे जखमी वृद्धेचे नाव आहे. घटनेची माहिती समजताच बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कपड्याने चेहरा झाकून घेतलेल्या एका
महिलेने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे. विमलाबाई पूर्णपणे शुद्धीवर आल्यावरच यामागचे नेमके कारण समजणार आहे.
स्थानिक नागरिकांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार विमलाबाई या शनिवार दि. 12 एप्रिल रोजी दुपारी आपल्या शेतात काम करीत होत्या. त्यावेळी कपड्याने चेहरा झाकलेल्या एका महिलेने पाठीमागून येऊन खुरप्याने विमलाबाई यांच्यावर हल्ला केला आहे. त्यानंतर विमलाबाई यांची कर्णफुले घेऊन हल्ला करणारी महिला तेथून फरारी झाली आहे. जखमी अवस्थेतील विमलाबाई कशीबशी मुख्य रस्त्यावर येऊन पोहोचली. त्यांच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. डोक्याला जबर दुखापत झाल्यामुळे हुबळी येथील किम्सला नेण्यात आले आहे. यासंबंधी बेळगाव ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधला असता एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.









