बेनकनहळ्ळीजवळ अपघात : ग्रामस्थांचा रास्तारोको
बेळगाव : भरधाव ट्रकने ठोकरल्याने सायकल-स्वार वृद्ध जागीच ठार झाला. सोमवार दि. 8 सप्टेंबर रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास बेनकनहळ्ळीजवळ ही घटना घडली असून बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी रास्तारोको केल्याची माहिती मिळाली आहे. मल्लाप्पा भरमा पाटील (वय 65) रा. रामघाट रोड, बेनकनहळ्ळी ता. बेळगाव असे त्या दुर्दैवी वृद्धाचे नाव आहे. यासंबंधी ट्रक चालक आनंद रामाप्पा गुत्ती रा. गुजनाळ ता. गोकाक याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती समजताच बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नागनगौडा रामगौडर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
बेळगावहून राकसकोपकडे जाणाऱ्या केए 51 एएफ 5855 क्रमांकाच्या ट्रकने ठोकरल्याने ही घटना घडली आहे. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकची सायकलला धडक बसली असून ट्रकच्या चाकात सापडून मल्लाप्पा यांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी रास्तारोको केला. ट्रक चालकाला आमच्या ताब्यात सोपवा, अशी मागणी करीत स्थानिक नागरिक संतप्त झाले होते. ट्रक चालकाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात वृद्धाचा बळी घेतला आहे. त्याच्यावर कडक कारवाई केली जावी, अशी मागणीही स्थानिक नागरिकांनी केली. बेळगाव ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत.









