जमिनीच्या वादातून मोठ्या भावाकडून कृत्य : यरगट्टी येथील घटना
बेळगाव : जमीन वादातून मोठ्या भावाने लहान भावाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्याचा खून केल्याची घटना यरगट्टी येथे घडली आहे. मुरगोड पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून पोलिसांनी मोठ्या भावाला ताब्यात घेतले आहे. गोपाल अर्जुन भावीहाळ (वय 27) रा. यरगट्टी असे खून झालेल्या दुर्दैवी लहान भावाचे नाव आहे. त्याचा मोठा भाऊ मारुती अर्जुन भावीहाळ (वय 30) याने त्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. मुरगोड पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून पोलिसांनी मारुतीला ताब्यात घेतले आहे.
यरगट्टीपासून जवळच गोपाल व मारुती यांची शेती आहे. गोपाल नशेत येऊन सतत मालमत्तेसंबंधी भांडणे करीत होता. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच या भावांनी वाटणी करून घेतली होती. तिन्ही भावांच्या वाट्याला शेतजमीन व प्रत्येकी एक ट्रॅक्टर आला होता. गोपालच्या वाट्याला आलेले ट्रॅक्टर त्याने आपल्या पत्नीच्या माहेरी ठेवला होता. याच मुद्द्यावरून भावंडांमध्ये भांडणे होत होती. मोटारसायकलवरून जाणाऱ्या गोपालच्या अंगावर ट्रॅक्टर घालून मोठ्या भावाने त्याचा खून केला आहे. स्थानिक नागरिकांनी बुदिगोप्प रस्त्यावर झालेल्या या घटनेचे व्हिडिओ चित्रीकरणही केले आहे. ट्रॅक्टर व मिळकतीच्या वादातून घडलेल्या या घटनेने एकच खळबळ माजली आहे. मुरगोड पोलीस पुढील तपास करीत आहेत.









