दारूच्या नशेत भांडण : रॉडने डोक्यात वार
वार्ताहर/धामणे
धामणे येथे मोठ्या भावाने लहान भावाचा लोखंडी रॉडने डोक्यात वार कऊन खून करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास मजीद गल्ली, धामणे येथे घडली. धामणे-मजीद गल्ली येथील मारुती भरमा बाळेकुंद्री व लक्ष्मण भरमा बाळेकुंद्री हे दोघे त्यांच्या आईसह स्वत:च्या घरी राहत असून या दोघा भावांमध्ये दररोज दारूच्या नशेत कडाक्याची भांडणे होत होती. बुधवार दि. 16 रोजी सकाळपासून दोन भावांमध्ये दारूच्या नशेत भांडण सुरू झाले. नंतर सकाळी 10.30 वाजता मारुती बाळेकुंद्री याने लहान भाऊ लक्ष्मण याच्या डोक्यात लोखंडी रॉडने चार ते पाच वार केल्याने लक्ष्मण अंगणात रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला. डोकीला जबर मार लागून लक्ष्मण (वय 28) जागीच ठार झाला. त्यानंतर अर्ध्या तासाने वडगाव ग्रामीण पोलीस अधिकारी आणि पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. त्यानंतर पंचनामा करण्यात आला. याप्रकरणी मारुती बाळेकुंद्री याला पोलिसांनी अटक केली आहे. लक्ष्मणची आई वृद्ध असून तिला डोळ्यांनी दिसत नाही. ग्राम पंचायतीने पुढाकार घेऊन लक्ष्मण याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. पंचनामा झाल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.









