आपल्याकडे कुटुंब व्यवस्थेत ज्येष्ठ पुत्राला मोठा भाऊ किंवा दादा असे संबोधले जाते, या पुत्राला अनेक कर्तव्ये आणि काही अघोषित अधिकार असतात. लहान भावंडांच्या तुलनेने त्यांचा जन्म आधीचा असल्याने व त्याला आई-वडिलांचा सहवास, प्रेम, माया अधिक मिळाल्याने जेव्हा संपत्तीची वाटणी होते तेव्हा कोणता वाटा घ्यायचा हा अधिकार सर्वात प्रथम लहान भावाला असतो. कारण उशिरा जन्म झाल्याने आई-वडिलांचा सहवास त्यास मोठय़ांच्या तुलनेने कमी लाभलेला असतो. दादा होणे तसे सोपे नाही. स्वर्गीय वसंतदादा पाटील यांना अवघा महाराष्ट्र ‘दादा’ म्हणत असे आणि ‘दादा’ सर्वांना मोठय़ा भावाच्या कर्तव्याने वागवत असत. स्वातंत्र्यलढय़ात तेव्हाच्या सातारा जिह्याचे आणि भूमिगत स्वातंत्र्यसैनिकांचे एक सोनेरी चमचमते पान लिहिले गेले आहे. वसंतदादांनी आपल्या भूमिगत सहकाऱयांना सांगलीत रेवणी रस्त्यावर आरोग्य शिबिर आणि लसीकरण शिबिर भरवल्याची नोंद आहे. त्यावेळी अनेकांनी वसंतदादांना म्हटले होते कशाला जोखीम घेतायं तेव्हा वसंतदादा म्हणाले होते हे सारे मला ‘दादा’ म्हणतात. ‘दादा’ म्हणजे मोठा भाऊ, मला मोठय़ा भावाचे कर्तव्य पार पाडले पाहिजे. दादांनी हे शिबिर यशस्वी केले व मोठय़ा भावाची जबाबदारी पार पाडली होती. अलीकडे राजकारणात दादा, भाऊ, आबा, आण्णा अशा बिरूदावल्या अनेकांना चिकटल्या आहेत तर काही ‘साहेब’ आहेत. राज्य पातळीवर अजित पवार यांना ‘दादा’ म्हटले जाते व राजकारणातील अनेक गुणवत्ता त्यांच्याकडे आहेत पण शेवटी ते पुतणे आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणूक मैदानात भाजपला चारीमुंडय़ा चीत करत काँग्रेसने स्वबळावर सत्ता हस्तगत केल्याने भाजप विरोधी लहान-मोठे घटक आनंदले आहेत. मोदी शहा यांचा पराभव होऊ शकतो हे वास्तव समोर आल्याने भाजप विरोधक एकमेकांना लाडू पेढे भरवत, फटाके फोडत आहेत व भाजपविरोधी आघाडीसाठी त्यांनी आत्मविश्वासाने पावले टाकायला प्रारंभ केला आहे. महाराष्ट्रात शिवसेनेला भाजपा युतीतून फोडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाआघाडी स्थापन केली आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करून महाराष्ट्रात सत्ता भोगली पण उद्धव ठाकरेंना आपले आमदार व खासदार सांभाळता आले नाहीत. 40 आमदार व 14 खासदारांनी पक्ष व पक्षचिन्ह हायजॅक केल्याने अडीच वर्षे सत्तेत असलेले महाआघाडी सरकार कोसळले आणि आता कोर्टकचेऱया, आरोप प्रत्यारोप याची राळ उठली आहे. हे सरकार कोणामुळे कोसळले यावरूनही एकमेकांकडे बोटे दाखवली जात आहेत. काँग्रेसो नेते नाना पटोले यांनी सभापतीपदाचा राजीनामा अचानक दिला त्यामुळे हे घडले असे म्हटले जाते आहे. उद्धव ठाकरे यांनी अविश्वास ठरावाला सामोरे न जाता व मित्रपक्षांना न विचारता राजीनामा दिला यामुळे सत्ता गेली असे म्हटले जात आहे तर महाआघाडीत सरकारी निधी व कामे केवळ राष्ट्रवादीचीच होत होती.त्यामुळे असंतोष होता त्याचा स्फोट झाला असे सांगितले जाते आहे. आता एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस सरकार सत्तारूढ झाले आहे आणि या सरकार विरोधी सर्व शक्ती एकत्र करून लढाई सर करण्याची योजना शरद पवार आखत आहेत. त्यांना मोठे पद हवे आहे आणि त्यांना भाजपला, मोदी शहांना पराभूत करण्यात रस आहे. कर्नाटक निकालामुळे अनुकूल वारे वाहत आहे. या पार्श्वभूमीवर महाआघाडीत मोठा भाऊ कोण यावर वाद सुरू झाले आहेत. भाजप शिवसेनेतही युती होती तेव्हा मोठा भाऊ,छोटा भाऊ असा वाद होता पण बाळासाहेब ठाकरे व प्रमोद महाजन ठरवतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण अशी अवस्था होती. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीतही मोठा भाऊ,छोटा भाऊ असा वाद होता पण काँग्रेसने नेहमीच मोठा भाऊ हा अधिकार सोडला नव्हता. आता महाआघाडीत तीन पक्ष व वंचित सारखे काही मित्रपक्ष समाविष्ट आहेत. निवडणुकीपर्यंत अनेकवेळा नदीतून पाणी वाहून जाणार आहे. पण आजघडीला महाआघाडीत मोठा भाऊ कोण यावरून छाती बडवली जाते आहे. कारण त्या आधारे तिकीट वाटप सुकर होणार आहे. कालची शिवसेना आणि आजचा ठाकरे गट यात खूप फरक आहे. त्यामुळे महाआघाडीत शिवसेनेला जागा वाटपासह कुठेही प्रथम स्थान मिळणार नाही हे स्पष्ट आहे. तिन्ही पक्षांना सोळा-सोळा जागा द्याव्यात व मतमोजणीनंतर लहान भाऊ व मोठा भाऊ ठरवावा अशी एक सूचना आली पण ती केवळ हवा होती. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी विद्यमान लोकसभेत आमचे 19 खासदार होते व ही संख्या कायम राहील असे म्हणत अधिक जागा म्हणजे मोठा भाऊ आपण, असे सुनावले आहे तर अजितदादा पवार यांनी सर्व पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस वरचढ आहे, आम्ही मोठा भाऊ असे म्हटले आहे तर नाना पटोले महाराष्ट्र हा काँग्रेसचा किल्ला आहे,कर्नाटक जनतेचा काँग्रेसला कौल मिळाला आहे, आम्हीच मोठे भाऊ असे सूचित केले आहे. महाआघाडीचे संभाव्य तिकीट वाटप व जागावाटप अशी एक फेक पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यात सांगली,कोल्हापूर, इचलकरंजी, माढा, सोलापूर, पुणे शहर, मुंबईतल्या सहा जागा व विदर्भ, मराठवाडय़ावर महाआघाडीचे घटक पक्ष दावा करत आहेत. सर्वच ठिकाणचे संदर्भ बदलले आहेत आणि गेल्यावेळी एकमेकांविरोधी लढलेले आता एका तंबूत बसले आहेत. ओघाने कोण मोठा भाऊ, कोण दादा आणि कोण मुख्यमंत्री हे काळच ठरवणार आहे. तूर्त आपणास अधिक जागा मिळाव्यात यासाठी रेटारेटी सुरू आहे आणि निवडणुकीनंतरही भूमिका बदलता येते, असा पायंडा उद्धव ठाकरे यांनी घालून दिला आहे. कुटुंबात मोठा भाऊ सगळ्यात शेवटी वाटा उचलत असला तरी राजकारणात मोठा भाऊ सर्वात प्रथम लचका तोडतो. पक्षात, पक्षाबाहेर वेगवेगळ्या तडजोडी करतो.मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीतील उमेदवार पाडण्याचा करेक्ट कार्यक्रम केला जातो. राजकारण साधण्यासाठी साम,दाम,दंड व भेद सर्व आयुधं वापरली जातात आणि शेवटी काही मास्टरस्ट्रोक असतात. मतदारांचे ध्रुवीकरण, कोणाला सहानुभूती असे प्रश्न आहेत पण कोणालाच काही सोपे नाही. तुर्त मोठा भाऊ कोण यावरून वाद सुरू आहे, हा वाद तिकीट वाटपापर्यंत चालणार हे स्पष्ट आहे.
Previous Articleकिर्गीजस्तानमधील कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर
Next Article निवृत्तीचा निर्णय आणखी 8 ते 9 महिन्यांत घेणार : धोनी
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








