वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अझरबैजानमधील बाकू येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या महिला नेमबाज इलावेनिल, रमिता आणि श्रेया अगरवाल यांनी महिलांच्या 10 मी. एअर रायफल सांघिक नेमबाजीत सुवर्णपदक पटकाविले.
महिलांच्या 10 मी. एअर रायफल सांघिक नेमबाजीतील अंतिम फेरीत भारताच्या इलावेनिल, रमिता आणि श्रेया यांनी डेन्मार्कच्या निल्सन, कोच आणि इबसेन यांचा 17-5 असा पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. या क्रीडाप्रकारात पोलंडच्या महिला संघाने कांस्यपदक मिळविले. पुरूषांच्या एअर रायफल सांघिक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या रूद्रांक्ष पाटील, पार्थ माकिजा आणि डी. श्रीकांत यांना क्रोएशियाकडून 10-16 असा पराभव पत्करावा लागल्याने त्यांचे कांस्यपदक हुकले. या स्पर्धेत भारताच्या 12 नेमबाजांनी सहभाग दर्शविला आहे. पदकतक्त्यात भारत पाचव्या स्थानावर असून सर्बिया दोन सुवर्णासह एकूण चार पदके मिळवित पहिल्या स्थानावर आहे.









