भारताची संपूर्ण कृषीव्यवस्था आणि अर्थव्यवस्था प्रामुख्याने मान्सूनवर अवलंबून असून, पावसाच्या प्रमाणावरच येथील शेती आणि अर्थकारणाचे भवितव्य ठरत असते. यंदाच्या मान्सूनवर एल निनोची छाया राहणार असली, तरी मोसमी पाऊस सर्वसाधारणच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तथापि, प्रशांत महासागरात एल निनोची स्थिती उद्भवली असून, याचा मान्सूनवर परिणाम होणार असल्याची भीती अमेरिकेतील क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने व्यक्त केली आहे. आत्तापर्यंतचा मान्सूनचा अडखळता प्रवास अन् क्लायमेट सेंटरचा अहवाल यामुळे दमदार मान्सूनबाबत साशंकता निर्माण झाली असून, चिंतेचे ढग गडद होताना दिसत आहेत.
भारतासारख्या उष्ण कटिबंधीय देशात मान्सून हा प्राणवायूप्रमाणे काम करतो. जून ते सप्टेंबर हे चार महिने पावसाचे मानले जातात. यातील जूनपासून ते 15 जुलैपर्यंतचा कालावधी पेरण्यांकरिता आदर्श मानतात. या काळात तसेच त्यानंतरच्या टप्प्यात पाऊस चांगला झाला, तर निश्चितपणे शेतीतील उत्पादन वाढण्यास मदत होते. तथापि, मान्सून लांबला व नंतरच्या टप्प्यातही त्याने मोठे खंड दिले, तर त्याचा उत्पादनावर परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर या वर्षीची एल निनो सक्रियता नि पाऊसमान, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

भारतात मान्सून यंदा कमी : सासकॉफ
जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या कालावधीत दक्षिण आशियाबरोबरच भारताच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज साउथ एशियन क्लायमेट आऊटलूक फोरमच्या अहवालातून वर्तविण्यात आला आहे. सासकॉफची 25 वी ऑनलाईन बैठक अलीकडेच पार पडली. त्यानंतर हा अहवाल जारी करण्यात आला आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान, भूतान, नेपाळ, भारत, मालदीव, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आदी देशांचा सासकॉफमध्ये समावेश असून, या देशांच्या हवामानाबाबतचे तसेच मान्सूनचा आढावा याद्वारे घेतला जातो. अहवालानुसार, अफगाणिस्तानच्या उत्तर भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस राहील. पाकिस्तानच्या दक्षिण भागात पावसाची तूट राहील. नेपाळ, बांग्लादेश, भूतानच्या बहुतांश भागात, म्यानमारच्या मध्यवर्ती भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहील.
भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस
भारताच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यात दक्षिण गुजरात, उत्तर गुजरात, मध्य प्रदेशचा मध्यवर्ती भाग, तेलंगणाचा काही भाग, दिल्ली, उत्तरप्रदेश, हिमाचल प्रदेशचा काही भाग, राजस्थान तसेच ओरिसा किनारपट्टीच्या किंचित भागात मान्सूनच्या कालावधीत पावसाची तूट राहील. जम्मू काश्मीर, दक्षिणेकडील बहुतांश भाग, पूर्व भारतातील तुरळक भागात अधिक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हे अंदाज काहीसे चिंता निर्माण करणारे ठरतात.

दमदार मान्सूनबाबत साशंकता
गेली तीन वर्षेही ला निनोची वर्षे होते. या काळात दमदार मान्सूनही नोंदविण्यात आला. आता ला निनोचा प्रभाव ओसरला असून, मान्सूनच्या कालावधीत एल निनो विकसित होण्याचा अंदाज आहे. यामुळे यावर्षी दमदार मान्सूनबाबत शंका आहे तसेच मान्सूनच्या आगमनाबाबतही भाष्य करणे, अवघड असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. सध्या आयओडी व एन्सोची स्थितीही तटस्थ आहे.
किमान तापमान जास्तच
जून ते सप्टेंबरच्या कालावधीत दक्षिण आशियाच्या बहुतांश भागात किमान तापमान अधिक राहणार आहे. याबरोबरच मध्य भारत (मध्य प्रदेश व महाराष्ट्राचा बहुतांश भागात) कमाल तापमान सरासरीइतके राहील. मात्र, इतरत्र कमाल तापमान अधिक राहण्याची चिन्हे आहेत.
हवामान विभागाचा दीर्घकालीन अंदाज
भारतीय हवामान विभागाने नैत्य मोसमी वाऱ्यांचा अर्थात मान्सूनचा दीर्घकालीन अंदाज दोन टप्प्यांत वर्तविला आहे. यातील दुसऱ्या टप्प्यांच्या अहवालानुसार, मान्सूनच्या कालावधीत एल निनो विकसित होणार असून, त्याचा प्रभाव मान्सूनवर होणार असला, तरी यंदाचा मान्सून सर्वसाधारणच राहणार आहे. तसेच जून महिन्यात पाऊस सरासरीपेक्षा कमी राहणार आहे.

सरासरीच्या 96 टक्के पाऊस होणार
2023 च्या मान्सूनचा दुसरा दीर्घकालीन अंदाज वरिष्ठ अधिकारी डॉ. डी. एस. पै यांनी जाहीर केला आहे. त्याबाबत पै म्हणतात, मान्सूनच्या कालावधीत एल निनो विकसित होण्याची शक्यता 90 टक्के आहे. याचा प्रभाव 2024 च्या थंडीच्या मोसमापर्यंत जाणवणार आहे. दुसरीकडे इंडियन ओशन डायपोल (आयओडी) हा मान्सूनच्या जून, जुलै, ऑगस्टच्या कालावधीत पॉझिटिव्ह राहणार आहे. पॉझिटिव्ह आयओडी हा नेहमीच चांगला मान्सून देणारा ठरला आहे. त्यामुळे एल निनोचा प्रभाव राहणार असला, तरी मान्सून सरासरीच्या 96 टक्के राहणार आहे. यामध्ये 4 टक्के कमी अधिकतेची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे.
वायव्य भारत वगळता सर्वत्र चांगला पाऊस
या चार महिन्याच्या कालावधीत वायव्य भारत वगळता (सरासरीच्या 92 टक्के ) मध्य भारत, पूर्वोत्तर भारत, दक्षिण भारतात सरासरीइतक्या (94 ते 106 टक्क्यांदरम्यान ) पावसाची अपेक्षा आहे.
कृषी प्रवण क्षेत्रात चांगला पाऊस
मध्य भारताचा बहुतांश भाग हा कृषीप्रवण क्षेत्रामध्ये येतो. या भागात मान्सूनच्या कालावधीत दमदार पाऊस राहण्याची चिन्हे आहेत.
दक्षिण भारतात चांगला पाऊस
दक्षिण भारतातील कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, तसेच जम्मू काश्मीरचा बहुतांश भाग, पूर्वोत्तर भारताचा बहुतांश भागात जून ते सप्टेंबरच्या कालावधीत सरासरीपेक्षा अधिक पाऊस राहील, तर गुजरात, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उद्राराखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओरिसा, आंध्र प्रदेशच्या बहुतांश भागात पाऊस सरासरीपेक्षा कमी राहणार आहे.
जूनमध्ये पाऊस कमी
जून महिना मान्सूनच्या आगमनाचा असल्याने पावसाचे प्रमाण या कालावधीत कमी अधिक राहते. यंदा जून महिन्यात पाऊस कमी राहणार असून, सरासरीच्या 92 टक्के पावसाची शक्यता आहे. जुलै महिन्यात मात्र पावसाची कमतरता भरून निघण्याचा अंदाज आहे. या कालावधीत बहुतांश भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहील. केवळ दक्षिण भारत, पूर्वोत्तर भारतात पाऊस चांगला बरसेल.
यंदाची चक्रीवादळे मान्सूनला तारक-मारक
यंदा भारतीय उपखंडात दोन वादळे निर्माण झाली. त्यातील पहिले मोचा वादळ हे बंगालच्या उपसागरात, तर दुसरे बिपोरजॉय वादळ हे अरबी समुद्रात निर्माण झाले. मोचामुळे अंदमानात मान्सून लवकर पोहोचला, तर बिपोरजॉयने मात्र मान्सूनची पश्चिम शाखा अडकून पडली. त्यामुळे ही दोन्हीही वादळे तारक मारक ठरली आहेत.
बंगालच्या उपसागरातील ‘मोचा’ चक्रीवादळ
बंगालच्या उपसागरात अंदमान समुद्राजवळ 11 मेच्या आसपास मोचा हे चक्रीवादळ निर्माण झाले. हे वादळ भारतीय किनारपट्टीला न धडकता पुढे म्यानमार बांग्लादेश किनारपट्टीला धडकले. मात्र, याच्या प्रभावामुळे अंदमानात 19 मेलाच मान्सून दाखल झाला. दरवर्षी साधारणपणे मान्सून 22 मेच्या आसपास अंदमान निकोबार बेटांवर प्रवेश करतो. यंदा मात्र तो तीन दिवस आधीच दाखल झाला आहे.
केरळात मान्सून उशिरा; बिपरजॉय अडथळा
दरम्यान, 1 जूनला केरळात दाखल होणारा मान्सून मात्र 8 जून उशिरा देवभूमीत पोहोचला. अरबी समुद्रात लक्षद्वीपजवळील 6 जूनच्या आसपास न्यून दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. पुढे याचे बिपरजॉय चक्रीवादळात ऊपांतर झाले. सुऊवातीच्या दमदार पावसानंतर बिपरजॉयने उग्र ऊप धारण केले. बराच काळ समुद्रात घोंघावत राहिल्यानंतर अखेर 16 जूनला हे वादळ गुजरातच्या जखाऊ बंदराजवळ धडकले. वादळामुळे वातावरणातील बाष्प, आर्द्रता या क्षेत्राकडे खेचली गेली. त्यामुळे मान्सूनची पश्चिम शाखा अडखळतच प्रवास करीत आहे. वादळामुळे नवीन यंत्रणा निर्माण होण्यास वेळ लागत असल्याने पोषक स्थितीअभावी मान्सूनची ही शाखा खोळंबून पडली आहे. याउलट मान्सूनची पूर्व शाखा अधिक सक्रिय असून, यामुळे पूर्वेकडचा अधिकचा भाग व्यापला आहे. त्यातच याच शाखेने आता विदर्भापर्यंतही मजल मारली आहे.
एल निनोचा पावसावर परिणाम : अमेरिकन क्लायमेट सेंटर
दरम्यान, प्रशांत महासागरात एल निनोची स्थिती उद्भवल्याचे अमेरिकेतील क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने म्हटले आहे. यामुळे मान्सूनवर परिणाम होणार आहे. यापूर्वी भारतीय हवामान विभागाने मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात एल निनोचा प्रभाव जाणवणार असल्याचे म्हटले होते. मात्र क्लायमेट सेंटरच्या अहवालानंतर चिंतेत भर पडली आहे. यामुळे मान्सूनच्या पहिल्या टप्प्यावरही परिणाम होणार असून, पाऊस कमी होण्याची शक्यता बळावली आहे.
जून कोरडाच
जूनमध्ये पावसाने ओढ दिली असून, 22 जूनपर्यंत देशभरात उणे 31 टक्के पाऊस झाला आहे. जुलै व ऑगस्ट महिन्यात दमदार पाऊस होण्याची आशा आहे. एका अभ्यासानुसार, जेव्हा जेव्हा एल निनो उद्भवला आहे, त्यातील 60 टक्के वर्षात पाऊस कमी झाला आहे. मात्र, मान्सून कालावधीत इंडियन ओशन डायपोल पॉझिटिव्ह राहणार असून, या स्थितीत पाऊस चांगला राहिल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे.
शेतीपुढे आव्हाने
दरवर्षी 1 जूनला मान्सून केरळात, तर 7 जूनला कोकणात दाखल होता. यंदा मात्र मान्सूनने आपला मुहूर्त चुकविला. अर्धे अधिक मृग नक्षत्र वाया गेले असून, पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेती व शेतकऱ्यांपुढे आव्हाने निर्माण झाली असून, पुढच्या टप्प्यातील पावसावर बरीचे गणिते अवलंबून असणार आहेत. अनेक भागांतील धरणे व जलाशयांतील साठाही घटला असून, काही शहरांमध्ये जेमतेम महिनाभर पुरेल इतक जलसाठा शिल्लक असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पावसाकडे सर्वजण आस लावून बसले असून, उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहेत.
एकूणच एल निनो मान्सूनच्या पहिल्याच टप्प्यात सक्रिय झाल्याचे दिसत आहेत. त्यात मान्सूनचा प्रवासही खंडात्मक राहिल्याने चिंतेचे ढग अधिक दाट झाले आहेत. जून महिना कोरडा गेल्याने आता चार महिने पाऊस कसा राहील, याचा घोर शेतकऱ्यांसह सर्वांच्या मनाला लागला आहे. मागची काही वर्षे पावसाच्या बाबतीत चांगली गेल्याने दुष्काळापासून आपला बचावच झाला आहे. एल निनो काळजाचा ठोका चुकवत असला, तरी या स्थितीतही पाऊस झाल्याची उदाहरणे सापडतात. त्यामुळे यंदा पाऊस दमदार व्हावा नि हे वर्षही भरभराटीचे जावे, हीच प्रत्येकाची अपेक्षा असेल.
अर्चना माने-भारती, पुणे









