अध्याय अठ्ठाविसावा
भगवंत म्हणाले, अनन्य भक्त पूर्णतया माझ्यावर विसंबून असतो. आई आणि ताह्या मुलाप्रमाणे योग्याचा देह आणि देव एक झालेले असतात. योग्यासाठी देहाचे काहीच महत्त्व उरत नाही मग देह राहिला काय आणि गेला काय? सगळे सारखेच! देह गेला तरी आत्मज्ञानी माणूस येथे असल्यासारखाच असतो. भगवंतांच्या ह्या बोलण्याचा प्रत्यय म्हणून कितीतरी साधूसंतांनी समाधी घेतल्यावर त्यांच्या अनन्य भक्तांना सगुण रुपात दर्शन दिल्याची उदाहरणे देता येतील. ज्याप्रमाणे ईश्वर पूर्णमिदम म्हणजे परिपूर्ण असतो तसेच अनन्य योगी, भक्त परिपूर्ण असल्याने त्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचे येणेजाणे संभवत नाही. गीतेत अर्जुनाला हेच सांगताना ते म्हणतात, सर्व ज्ञानामधे थोर ज्ञान ते सांगतो पुन्हा । जे जाणूनि इथे मोक्ष पावले सगळे मुनि । 14 .1 । ह्या ज्ञानाच्या बळाने ते झाले माझ्या चि सारखे । जगे येवोत जावोत ते अभंग जसे तसे । 14 .2 । आत्मज्ञानी पुरुष अभंग असतात ते कितीही वेळा जगात आले आणि गेले तरी त्यांना काहीही फरक पडत नाही. भगवंत पुढे म्हणाले, उद्धवा, अनन्य भक्तांच्या मन:स्थितीबद्दल किती बोलीन तेव्हढं थोडं आहे कारण त्यांची मन:स्थिती हेच माझ्यासाठी एक कोडं आहे. भक्ताच्या मन:स्थितीची संपूर्ण कल्पना मला येऊ शकत नाही. फक्त काही उदाहरणे देऊन मी त्याच्या मन:स्थितीची साधारण कल्पना तुला देऊ शकतो. उदाहरणार्थ, तो झोपायला म्हणून शयनगृहात जातो पण आपण कशावर झोपलोय हे काही त्याच्या लक्षात येत नाही. आपण झोपलोय हेही त्यांच्या मनात येत नाही. तो आपला सदैव आत्मस्वरुपात मग्न असतो. तो जेवायला तर बसतो पण त्याला भुकेची जाणीव होत नसते. आपण जेवतोय ह्याची जाणीवच नसल्याने जिभेने आपण जो रस चाखला तो गोड आहे की आंबट आहे, कडू आहे की तिखट आहे हेच त्याच्या लक्षात येत नाही. तो आपला निजानंदात मग्न असतो. दिसताना तर तो जेवत आहे असं दिसतं पण प्रत्यक्षात जेवण्यापूर्वी त्याला भुकेची जाणीव झालेली नसते किंवा जेवल्यावर आपलं पोट भरलंय असंही त्याला वाटत नाही. त्याने संसार उष्टावलासुद्धा नसतो मग त्याने त्याचा त्याग केलाय असं आपलं म्हणायचं एव्हढच! जरी तो बोलत असला तरी ते सगळं वरवरचं असतं! दिसताना तो गोड गोड गोष्टी बोलताना दिसतो, त्याचं बोलणं मोठं रसाळ असतं, ऐकणाऱ्याला तो आपल्या बोलण्यात गुंतवून ठेऊन मोहित करून टाकतो. पण हे सगळं आपणच बोलतोय असा भाव त्याच्या मनात नसल्याने तो मनोमन मौनच असतो. आपल्या बोलण्यावर समोरची मंडळी मुग्ध झाली आहेत म्हणजे मी किती चतुराईने बोलतोय असा कोणताही भाव त्याला स्पर्शही करत नाही. ज्याप्रमाणे संमोहित झालेल्या व्यक्तीला आपण काय बोलतोय किंवा कोणत्या हालचाली करतोय ह्याचे बिलकुल भान नसते, त्याप्रमाणे योगी माझ्यावरील प्रेमात इतका आकंठ बुडालेला असतो की, त्याला मी सोडून इतर कशाचेच भान नसल्याने देहाने तो कोणकोणत्या क्रिया करतोय, काय बोलतोय इकडे त्याचे लक्षच नसते आणि असणार तरी कसं? तो स्वत:च्या शरीराची ओळख विसरून माझेच रूप झालेला असतो मग देहाच्या वागण्याबोलण्याची फिकीर तो करेलच कशाला? तो सगळीकडे स्वस्वरूपाला पहात असल्याने तो जरी समोरचा दृश्य संसार पहात आहे असे वाटत असले तरी प्रत्यक्षात सर्वत्र विश्वव्यापी ईश्वरालाच पहात असतो. त्याच्या लेखी समोर दिसणाऱ्या संसाराचे अस्तित्व असतेच कुठे? त्याच्या दृष्टीने तो केवळ भासच असतो. त्यामुळे तो भासमान दृश्याला काय किंमत देणार? उद्धवा, समज भिंतीवर अनेक सुंदर चित्रे काढलेली असली तरी ती पुसल्यावर त्यांचे काहीच अस्तित्व उरत नाही. समोर केवळ भिंत दिसते. देही असून विदेही अवस्था उद्धवाला समजावून देताना भगवंत स्वत:च भान विसरून बोलत होते.
क्रमश:








