नव्या सरकारच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. काल विधानसभा अध्यक्षांची देखील बिनविरोध निवड झाली. 16 fिडसेंबरपासून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूर येथे सुरूवात होत आहे. सुरूवातीला 11 डिसेंबरला होणारा शपथविधी आता लांबणीवर गेला असून, 14 डिसेंबरला हा शपथविधी होणार असल्याची शक्यता आहे. महायुती सरकारला जनेतेने दिलेले मँडेट लक्षात घेता, मंत्रीमंडळ विस्तारात मोठ्या प्रमाणात धक्कातंत्राचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला कोणती खाती मिळणार, अजित पवार यांनी सुरूवातीलाच भाजपला पाठिंबा देऊन शिवसेनेची ताकद कमी केली. तरीही शिंदे यांनी गृहखात्यावऊन भाजपला शेवटच्या क्षणापर्यंत गॅसवर ठेवले. आता खातेवाटपाबाबत चर्चा सुरू आहे. तीन पक्षांचा सहभाग असल्याने यात समन्वय साधणे अवघड होत आहे. ज्या राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा देऊन शिवसेनेची ताकद कमी केली, त्याच राष्ट्रवादीकडची चांगली खाती शिंदे हे भाजपकडून पदरात पाडून घेणार आणि भाजपला पण ती द्यावीच लागतील. भाजप राष्ट्रवादीसोबत असल्याने सरकारचे काही अडत नसल्याचे दाखवत असली तरी, शिंदेंच्या चेहऱ्याशिवाय महायुतीचे सरकार हे पूर्ण होऊ शकत नाही हे भाजपला माहीत आहे.
होय नाही होय नाही बोलता निकालाच्या बारा दिवसानंतर राज्याला मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री मिळाले. या तीन लोकांबरोबर इतर मंत्र्यांचा पण शपथविधी आझाद मैदान येथे दिमाखदार सोहळ्यात होईल असे वाटत होते, पण तसे काही झाले नाही. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतात की नाही हे शेवटपर्यंत ठरत नव्हते, अखेर शेवटच्या क्षणी त्यांनी शपथ घेतली. त्यानंतर राज्यातील 288 आमदारांनी शपथ घेतली, काल विधानसभा अध्यक्ष म्हणून अॅड. राहुल नार्वेकर यांची दुसऱ्यांदा निवड झाली. आता सगळ्याचे लक्ष लागले आहे ते मंत्रीमंडळ विस्ताराकडे. राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार करताना तीन पक्षात कोण मंत्री होणार ही चर्चा सध्या होत असली तरी, अजुनही खाते वाटपावर घोडे अडले आहे. गृहखाते मिळावे यासाठी एकनाथ शिंदे अजुनही ठाम असल्याचे समजते. शिंदे यांनी अजुनही गृहखाते न स्विकारण्याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही.
2014 लोकसभा निवडणुकीनंतर देशात नरेंद्र मोदी यांची लाट आल्यानंतर भाजपने महाराष्ट्रात ना उध्दव ठाकरे ना शिवसेना कोणालाच कधी इतके महत्त्व दिले नाही, आज तितके महत्त्व भाजप एकनाथ शिंदेंना देताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ शिंदे यांनी घ्यावी यासाठी देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन चर्चा केली. राष्ट्रवादीने निकालानंतर लगेच भाजपला पाठिंबा देऊन शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी केली असली तरी, शिंदेंच्या सरकारमधल्या सहभागाशिवाय भाजप-राष्ट्रवादी मिळून महायुती सरकार पूर्ण होणार नाही आणि शिंदेंशिवाय लोक या सरकारला स्विकारणार नाही, याची जाणीव शिंदे यांना असल्याने या सरकारमधील समावेशाबाबत किंवा खातेवाटपाबाबत अजुनही भाजपला हायसे वाटेल असे ते बोललेले नाहीत. पहिल्या दिवसापासून केवळ आपला सरकारला कोणताही अडथळा नाही, हे लोकांचे सरकार आहे. लाडक्या बहीण, भाऊ यांचे सरकार असल्याचे बोलत आहेत.
एकनाथ शिंदे यांची नाराजी दुर करण्यात भाजपला यश आले असे लोकांना वाटत असले तरी शिंदे हे अजुनही गृहखात्यावर ठाम आहेत. ज्या राष्ट्रवादीने महायुती सरकारमध्ये सामील झाल्यावर शिंदेंकडच्या मंत्र्यांकडे असलेली चांगली खाती खेचली, आज शिंदे भाजपच्या माध्यमातून तोच प्रयत्न करणार आणि राष्ट्रवादी कडील काही महत्त्वाची खाती खेचणार.
कोणाला कोणते खाते मिळणार, कोणाला नारळ मिळणार, कोणाला डच्चु मिळणार हा नंतरचा प्रश्न आहे. आधी कोणत्या पक्षाला कोणती खाती मिळणार हे महत्त्वाचे आहे. प्रत्येक जिह्यात आज भाजपसोबतच एकनाथ शिंदे यांची ताकद वाढलेली दिसत आहे. 11 किंवा 12 डिसेंबरला मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा होती, मात्र आता हा विस्तार 14 डिसेंबरला होणार असल्याचे समजते. जर यशस्वी तोडगा निघाला नाही तर हिवाळी अधिवेशन केवळ तीन मंत्र्यांवर उरकले जाऊ शकते, 2019 ला उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्यावेळी शिवाजी पार्कवर त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, नितीन राऊत आणि राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांनी शपथ घेतली होती. ठाकरे सरकारचे 2019 चे नागपूर येथील पहिलेच हिवाळी अधिवेशन हे या सहा मंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडले होते. आज महाराष्ट्रातील प्रत्येक जिह्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद वाढलेली दिसत आहे. गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री असताना त्यांनी शिवसेना वाढवली, मुख्यमंत्री असताना कोणत्याही जिह्यात कोणत्याही पक्षाचा पालकमंत्री असला तरी, आमदारांना मुख्यमंत्री थेट मदत करतो. रायगड जिह्यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले, महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांनी मविआत असताना पालकमंत्री आदिती तटकरे या निधी देत नसल्याचा आरोप शिवसेना सोडताना आरोप केला होता. अजित दादांच्या प्रवेशाने पुन्हा तटकरे याच पालकमंत्री झाल्या आता, आता भाजप आमदारांची प्रत्येक जिह्यात आमदारांची संख्या वाढली आहे.
रायगडमध्ये आज भाजप आणि शिवसेनेचे प्रत्येकी तीन तर राष्ट्रवादीचा एक आमदार आहेत, पण गेली पाच वर्ष पालकमंत्री राष्ट्रवादीच्याच होत्या तर साताऱ्यात भाजपच्या आमदारांची संख्या दोन वऊन चार झाली आहे. शिवसेनेचे दोनच आमदार होते आणि पुन्हा निवडून आले. मात्र गेली पाच वर्ष शंभुराज देसाई पालकमंत्री होते. आता बहुतांश जिह्यात भाजपची ताकद वाढल्याने, पालकमंत्री विरूध्द आमदार असा वाद होऊ शकतो. त्यामुळे आता मंत्रीपदाबरोबरच पालकमंत्री पदे मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे यांची कसोटी लागणार आहे.
प्रवीण काळे








