ऑनलाईन टीम / तरुण भारत :
नगरविकास खात्याला 12 हजार कोटी दिले. तरीही निधी मिळत नसल्याचा खोटा आरोप शिंदे गटाने केला. 106 संख्याबळ असणारा CM होत नाही आणि 40 संख्याबळ असणारा CM होतो. यात काहीतरी काळंबेरं आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.
भाजपा-शिंदे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावानंतर सभागृहातील भाषणादरम्यान ते बोलत होते. अजित पवार म्हणाले, सुरतला जाण्यापूर्वी सत्तार 2 तास अगोदर माझ्याशी सत्तार बोलले. जाताना आम्हाला सांगितलं नाही. फुटणाऱ्या शिवसेना नेत्याबरोबर शिवसेना जात नाहीत, हा इतिहास आहे. मोठी लोक कधी एकत्र येतील तुम्हाला कळणार नाही, तुम्ही मागे रहाल. सेनेसोबत बंडखोरी करणारे आमदार पुन्हा कधीही निवडून आले नाहीत. शिंदेंमध्ये पात्रता होती तर 2014 च्या फडणवीस सरकारमध्ये एकच खातं का दिलं गेलं? असा सवालही त्यांनी फडणवीसांना विचारला.
आज अनेक गोष्टी न्यायप्रविष्ट आहेत. 11 तारखेला सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. कोर्ट निर्णय देईपर्यंत विश्वासदर्शक ठराव घेण्याची काय गरज होती? असा प्रश्न देखील अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच फडणवीसांचा जोश आता पहिल्यासारखा दिसत नाही. विधिमंडळात निवडून आलेल्या आमदारांमध्ये सर्वात नशीबवान देवेंद्र फडणवीस. अडीच वर्षात ते मुख्यमंत्रीही झाले, उपमुख्यमंत्रीही झाले आणि विरोधी पक्षनेतेही झाले. एकही महत्वाचं पद त्यांनी सोडलं नाही, असा टोलाही त्यांनी फडणवीसांना लगावला.








