ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्यातील राजकीय नाट्यमय घडामोडीची सांगताही तितक्याच नाट्यमयरित्या झाली. राज्यपालांच्या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) राजकीय बॉम्ब फोडत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील असे म्हणत सर्वांनाच धक्का दिला. अनपेक्षितपणे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्विकारले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. हा शपथविधी सोहळा राजभवन येथे पार पडला. दरम्यान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी होताच एकनाथ शिंदे (Eeknath Shinde) रात्रीच गोव्यात पोहोचले. ज्या हॉटेलमध्ये शिंदे गटातील आमदारांना ठेवण्यात आले आहे, त्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे मध्यरात्री दाखल झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हॉटेलमध्ये पोहोचताच शिंदे गटातील सर्व आमदारांनी त्यांचं अभिनंदन केलं.
शपथविधी सोहळा संपन्न झाल्यानंतर महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री उशीरा गोवा (Goa) येथील ताज हॉटेलमध्ये पोहोचले. यावेळी शिवसेना आणि सहयोगी आमदारांच्या वतीने त्यांचं गोव्यात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनीही पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. तर शिवसेनेच्या महिला आमदारांनी त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं.