स्थानिक नागरिक व पर्यटकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे
प्रतापगड : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे यांचे मूळ गाव असलेल्या दरे गावाकडे जाणारा म्हणजेच महाबळेश्वर–तापोळा हा महत्त्वाचा मार्ग सध्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला असून, दरड कोसळल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती आणि दगड आले आहेत.
यामुळे स्थानिक नागरिक व पर्यटकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संततधार पावसामुळे महाबळेश्वर–तापोळा रस्त्यावर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत.
रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती, चिखल व दगड आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे की, रस्त्याच्या एका बाजूला दरड कोसळून मोठा ढिगारा साचला आहे, ज्यामुळे रस्ता पूर्णपणे अडकला आहे. रस्त्याच्या मधून पाण्याचा प्रवाह वाहत असल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.
स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर नाराजी व्यक्त केली आहे. रस्ता बंद झाल्यानंतरही विभागाने रस्त्याच्या सुरुवातीला किंवा प्रमुख चौकात ‘रस्ता बंद’ असल्याचा कोणतीही सूचना फलक (बोर्ड) लावलेला नाही.
यामुळे अनेक पर्यटक व स्थानिक नागरिक नाहक प्रवास करून घटनास्थळापर्यंत पोहोचतात. आणि त्यांना तिथूनच माघारी फिरावे लागते, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा वाया जात आहे. आम्ही खूप लांबून आलो, पण इथे येऊन पाहिले तर रस्ता बंद आहे आणि त्याची कोणतीही पूर्वसूचना नव्हती, असे एका पर्यटकाने सांगितले.
स्थानिक व्यक्तीच्या माहितीनुसार, या रस्त्यावर नियमितपणे दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात नाहीत, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.
तात्पुरती डागडुजी करून रस्ता सुरू केला जातो, पण पावसाळ्यात पुन्हा तीच परिस्थिती उद्भवते. या गंभीर परिस्थितीमुळे तापोळ्याला जाणारे पर्यटक आणि स्थानिक रहिवासी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यांना आता लांबच्या पर्यायी मार्गांनी प्रवास करावा लागत आहे, ज्यामुळे प्रवासाचा कालावधी आणि खर्च दोन्ही वाढले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करावा आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पर्यटक आणि स्थानिकांकडून होत आहे. तसेच, रस्ता बंद असताना त्याची योग्य माहिती देणारे फलक लावण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.








