ऑनलाईन टीम / तरुण भारत :
सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने बरीचशी स्पष्टता झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नोंदणीकृत शिवसेना गेल्याने ठाकरे अडचणीत आले आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या निर्णय होईपर्यंत ते नवा पक्षही नोंदणीकृत करू शकत नाहीत. तर, भविष्यात एकनाथ शिंदे हे भाजपलाही डोईजड ठरू शकतात, असा मतप्रवाह असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
आंबेडकर नागपुरात काल पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकार सध्या स्थिर असले तरीही राज्यात ऑगस्टपर्यंत अस्थिरता असेल. मविआमध्ये राष्ट्रवादीची घुसमट होत आहे. तुरुंग की स्वतंत्रता? यापैकी एकाचा निर्णय त्यांना करायचा आहे. येत्या तीन ते चार महिन्यांत याबाबतची कारवाई सुरू होऊ शकते. कारण काँग्रेस आपला पहिला क्रमांक सोडायला तयार नाही. कर्नाटकच्या निकालानंतर अनेकजण मोकळेपणाने बोलत आहेत. परंतु, जेडीएसमुळे काँग्रेसला तेथे फायदा झाल्याचाही दावा आंबेडकरांनी केला.








