ऑनलाईन टीम/तरुण भारत
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या अडचणी वाढल्याचे दिसून येत आहे. खडसे यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. भोसरी भूखंड प्रकरणी एकनाथ खडसे (Notice to Eknath Khadse) यांच्यावर कारवाई सुरु आहे. एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई यांच्यावरसुद्धा कारवाई करण्यात आली आहे. खडसेंची ईडीने ( ED) या प्रकरणामध्ये चौकशी केली होती. तसेच संपत्ती जप्त केली होती. जप्त केलेली मालमत्ता खाली करण्याचे आदेश आता ईडीने दिले आहेत. ईडीने नोटीसद्वारे एकनाथ खडसे यांना आदेश दिला आहे.
ईडीकडून एकनाथ खडसे यांची गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात ५ कोटी ७५ लाखांची संपत्ती जप्त करण्यात आली होती. यामध्ये जळगाव आणि लोणावळा येथील जागेचा समावेश होता. यामध्ये लोणावळ्यातील बंगला आणि जळगावमधील ३ फ्लॅट आणि ३ मोकळे भूखंड ईडीने जप्त केले होते. ही मालमत्ता १० दिवसांमध्ये रिकामे करण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. तसे नाही केल्यास कायदेशीररित्या या मालमत्ता रिकाम्या केल्या जातील असे नोटीशीत नमूद केले आहेत. तसेच संबंधित मालमत्ता विक्री, भाडेकरारावर किंवा हस्तांतरण करण्याची परवानगी कोणालाही देण्यात येऊ नये, असे नोंदणी महानिरिक्षक आणि संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनाही कळवण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर ईडीचा ससेमीरा लागला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने कारवाई केली होती. खडसेंच्या ११ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. या मालमत्ता रिकाम्या करण्यात याव्यात असे आदेश देण्यात आले आहेत. एकनाथ खडसेंनी मंत्री असताना पदाचा गैरवापर केला असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. खडसेंना ३० मे रोजी नोटीस बजावण्यात आली आहे. मुंबई, नाशिक, पुणे, जळगाव, लोणावळामध्ये खडसेंची मालमत्ता आहे. ही मालमत्ता खाली करण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. येत्या १० दिवसांमध्ये मालत्ता खाली करण्यास सांगण्यात आले आहे.








