ऑनलाईन टीम/ तरुण भारत
भाजपनं फक्त गाजर दाखवलं, म्हणून राष्ट्रवादीत (NCP) यावं लागलं. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना उमेदवारी नाकारुन अन्याय केला आहे. गोपीनाथ मुंडेनी केलेल्या त्यागाचा भाजपला विसर पडला आहे. अशी खंत एकनाथ खडसे (Eknath khadse) यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादीने विधानपरिषदेसाठी अधिकृत घोषणा करत एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करत पसंतीची मोहर उठवली आहे. यानंतर खडसेंनी माध्यमांशी संवाद साधला.
भाजपवर निशाणा साधताना ते म्हणाले, भाजपमध्ये अनेक वर्ष निष्ठेनं काम केले पण भाजपने माझी फसगत केली. भाजपनं अडगळीत टाकल्यानंतर शरद पवारांनी हात दिला (Sharad Pawar)माझ्यावर विश्वास ठेवत मला उमेदवारी दिली आहे. तो विश्वास मी सार्थ करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच मला जेथे जेथे शक्य आहे तेथे मी राष्ट्रवादीचा प्रसार करणार असल्याचा असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाजपाने पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाकारली याविषयी बोलताना ते म्हणाले, भाजपचा पक्षातंर्गत जरी निर्णय असला तरी महाराष्ट्रात मुंडे-महाजन-खडसे या कुटुंबानी भाजप मजबूत केला आहे. महाराष्ट्रात आज जो भाजपाचा चेहरा दिसत आहे यात गोपीनाथ मुंडे यांचे सर्वात मोठे योगदान आहे. याचा भाजपला विसर पडला आहे. ज्यांनी पक्षासाठी काहीच केलं नाही असे लोक अचानक येतात आणि गादीवर बसतात. आणि ज्यांनी आयुष्य खर्ची केलं त्यांच्यावर मात्र अन्याय केला जातो अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात बोलताना ते म्हणाले, भाजपाने मुद्दाम तिसरा उमेदवार उभा केला आहे. यात ते घोडेबाजार करणार हे स्पष्ट आहे. गेल्या २३ वर्षात असे प्रकार कधीच झाले नाहीत. आता जो घोडेबाजाराचा प्रकार आहे तो लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचेही खडसे म्हणाले.








