रस्ता दुभाजक ठरणार वाहतूक कोंडीचे कारण : हजारोंच्या गर्दीवर नियंत्रण ठेवणेही होणार कठीण
पणजी : राजधानीत मांडवीतीरी आजपासून भरणाऱ्या अष्टमीच्या फेरीसाठी तब्बल 410 स्टॉल्सना मान्यता देण्यात आली असून कांपाल येथील महावीर उद्यान ते थेट बेती फेरीबोट धक्क्यापर्यंतच्या लांब पट्ट्यात ही फेरी भरणार आहे. त्यामुळे हजारो लोक आणि शेकडो वाहनांच्या वर्दळीमुळे होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवताना पोलिसांची कसोटी लागणार असल्याचे दिसून येत आहे. तसे पाहता ही फेरी यंदा प्रथमच भरत आहे, असा प्रकार नसला तरी यंदा इफ्फीकाळात या संपूर्ण रस्त्याला कायमस्वऊपी उंच गडगंज स्टीलचे दुभाजक बसविण्यात आल्याने रस्ता ओलांडण्यास (अपवाद वगळता) वाटच ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे फेरीसाठी येणारे लोक आणि वाहनांची वर्दळ एकाच बाजूने होणार असल्याने परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.
वाहतूक कोंडी होणार
सध्याची येथील एकंदर परिस्थिती पाहता या फेरीसाठी नियोजनाचा पूर्णत: बट्ट्याबोळ दिसून येत आहे. एका बाजूने शहरात पार्किंगसाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. त्यात फेरी म्हटल्यावर लांबलांबून लोक येणार असल्याने वाहनांच्या गर्दीचाही राजधानीवर ताण पडणार आहे. भरीस प्रत्येकाला आपले वाहन थेट खरेदीच्या ठिकाणीच ठेवायचे असते. त्यातून अस्ताव्यस्त पार्किगचेही प्रकार घडणार असून परिणामी वारंवार वाहतुक कोंडीची समस्या उद्भवणार आहे.
नियोजनाची लागणार कसोटी
सदर फेरी आज दि. 7 पासून भरणार असली तरी दुकाने थाटण्यासाठी इच्छुक व्यापारी आपल्या सामानासह आठवडाभरापूर्वीच राजधानीत दाखल झाले आहेत. केवळ अर्ज मिळविण्यासाठीच त्यांनी चक्क तीन दिवस मनपासमोर ठाण मांडले होते. त्यांच्या झुंबडीमुळे या परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. हजारोंच्या संख्येने आलेल्या या लोकांपैकी बहुतेकजण उघड्यावरच जेवणखाण बनवतात, तेथेच आंघोळ आदी नैसर्गिक विधी उकरतात आणि रात्री तेथेच झोपतात, असे दिसून आले आहे. पुढील 12 दिवसात या प्रकारात आणखीही भर पडणार असून परिस्थिती अधिक विदारक होणार आहे. ही परिस्थिती मनपा कशाप्रकारे हाताळते त्यावर सर्वकाही अवलंबून राहणार आहे. अन्यथा शहरभर दुर्गंधी, मांडवीत प्रदूषण आणि एकुणच ओंगळवाणे चित्र निर्माण होणार आहे.









