लोणावळा / वार्ताहर :
लोणावळा व मावळ तालुक्यामध्ये मागील चार दिवसापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे तसेच पुढील दोन ते तीन दिवस हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे मावळ तालुक्यामध्ये पूरस्थिती निर्माण होऊ शकते. याकरिता तातडीच्या उपाययोजना करण्याबाबत मावळ तालुक्याचे खासदार श्रीरंग बारणे यंनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दोन दिवसापूर्वी पत्र दिले होते. या पत्रानंतर मावळ तालुका प्रशासन ॲक्टिव्ह मोडवर आले असून, खासदार श्रीरंग बारणे यांच्या पत्राचा हवाला देत तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्हा प्रशासनाकडून पुणे जिल्हय़ामधील 23 गावांना धोकादायक गावे म्हणून घोषित करण्यात आली आहेत. यापैकी आठ गावे मावळ तालुक्यामधील असल्याने मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी काल स्वतः सर्व गावांना भेटी देत त्या ठिकाणच्या धोकादायक भागाची पाहणी केली. तद्नंतर लोणावळा वडगाव व तळेगाव नगर परिषदेचे सह सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज वितरण विभाग महसूल विभाग कृषी विभाग या सर्वांना लेखी पत्र देत आपआपल्या भागामध्ये पाहणी करत धोकादायक भागांची माहिती तहसील कार्यालयाला कळवण्याबाबत सूचित केले आहे. तसेच जोरदार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाल्यास त्या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविणे किंवा धोकादायक भागामधील नागरिकांचे स्थलांतरण करण्याकरिता आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
लोणावळा व मावळ तालुक्यामध्ये पावसाचा जोर वाढत असल्याने इंद्रायणी, पवना, आंद्रा या नद्यांच्या बाजूंना असणाऱ्या गावांना व घरांना पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच डोंगर भागाला लागून असलेल्या गावात भूस्ख्खलन सारख्या घटना घडू शकतात. याकरिता सर्व शासकीय अधिकाऱयांनी आपल्या कार्यक्षेत्राच्या परिसरातच थांबावे व योग्य त्या उपाययोजनांचे नियोजन करावे, अशा सूचना तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिल्या आहेत. पूरस्थितीमुळे झाडे पडणे, घरे पडणे, शेती पिकांचे नुकसान असे प्रकार घडल्यास तात्काळ त्यांचा पंचनामा करणे, पाऊस व वारा यामुळे लाईटचे खांब पडणे, तारा तुटणे असे प्रकार घडल्यास तात्काळ दुरुस्ती करणे, पावसामुळे पूल वाहून जाणे, रस्ता खचणे असे प्रकार घडल्यास त्यावर ताबडतोब उपाययोजना करणे याबाबत संबंधित विभागांना पत्राद्वारे सूचित करण्यात आले आहे.