9600 ऊपयांमध्ये ग्राहकांना कार जिंकण्याची संधी : कलाश्री ग्रुपने विश्वासार्हता निर्माण केल्यामुळेच सर्वच योजनांना चांगला प्रतिसाद
बेळगाव : श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर अशोकनगर येथील फूल बाजारात आवक वाढू लागली आहे. दररोज साधारण आठ ते दहा टन विविध आकर्षक फुलांची आवक होत आहे. त्यामुळे बाजाराला फुलांचा बहर येऊ लागला आहे. उलाढाल वाढल्याने व्यापारी, उत्पादक आणि किरकोळ विक्रेत्यांतूनही समाधान व्यक्त होत आहे. 5 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला प्रारंभ झाला आहे. या महिन्यात व्रतवैकल्ये आणि इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे फुलांच्या मागणीत वाढ होत आहे. विशेषत: झेंडू, गुलाब, शेवंती, मोगरा, जुई आदी फुलांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. श्रावण महिन्यात पूजा-अर्चा, धार्मिक कार्यक्रम आणि मंदिरांच्या सजावटीसाठी लागणाऱ्या फुलांची मागणी वाढली आहे. त्यामुळे फूल बाजारात सकाळी लिलावासाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे.
यंदा श्रावण महिन्यात पाच सोमवार आले आहेत. दर सोमवारी मंदिरांतून विशेष पूजा आणि इतर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. विशेषत: शिवालयांतून भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. घरोघरी श्रावणानिमित्त धार्मिक कार्यक्रम होऊ लागले आहेत. त्याचबरोबर श्रावणी शुक्रवारी महिलांकडून महालक्ष्मीचे पूजन केले जाते. या पार्श्वभूमीवर बाजारात हार-फुलांना पसंती दिली जात आहे. जुलैच्या मध्यानंतर मुसळधार पावसामुळे बागायती पिकांना फटका बसला आहे. त्यामध्ये फूलशेतीचे नुकसान झाले. परिणामी उत्पादकांना फटका बसला आहे. त्यामुळे फुलांचे दर काहीसे वाढले आहेत. श्रावण संपेपर्यंत फुलांची मागणी कायम राहणार असल्याची माहितीही फूल व्यापाऱ्यांनी दिली आहे.
बागलकोट, बेंगळूर येथून फुलांची आवक
फूल बाजारात दररोज सकाळी दहा टन फुलांची आवक होत आहे. जिल्ह्याबरोबरच बागलकोट,बेंगळूर आणि चित्रदुर्ग येथूनही विविध फुले येत आहेत. श्रावणामुळे मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे आवक होत आहे.
– महांतेश मुरगोड,(सहसंचालक, बागायत खाते)









