बाजाराला बहर, झेंडू-गुलाबाचे आकर्षण : नागरिकांची रेलचेल
बेळगाव : श्रावणाच्या पार्श्वभूमीवर फुलांची आवक वाढू लागली आहे. अशोकनगर येथील होलसेल फूल बाजारात दररोज आठ ते दहा टन आकर्षक फुलांची आवक होऊ लागली आहे. त्यामुळे फूलबाजार बहरू लागला आहे. शिवाय उलाढाल वाढल्याने व्यापाऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. अशोकनगर येथील फूल मार्केटमध्ये झेंडू, गुलाब, शेवंती, मोगरा, जुई, अबोली आदी फुलांची आवक दिसून येत आहे. विशेषत: झेंडू आणि गुलाब फुलांची आवक अधिक आहे. श्रावण महिन्यात पूजा-अर्चा आणि धार्मिक कार्यक्रमांना पसंती दिली जाते. त्यामुळे फळ, फुलांबरोबर हारांना मागणी अधिक असते. त्यामुळे होलसेल बाजारात फुलांची आवक वाढू लागली आहे. त्यामुळे पहाटेच्या वेळी लिलावासाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे.
17 ऑगस्टपासून निजश्रावण मासाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. दर सोमवारी शिवालयांमधून भाविकांची दर्शनासाठी गर्दी होऊ लागली आहे. त्याबरोबरच श्रावणी शुक्रवारनिमित्त महिलांकडून महालक्ष्मीचे पूजन केले जात आहे. त्यामुळे हार व फुलांना बाजारात मागणी वाढू लागली आहे. यानुसार होलसेल मार्केटमध्येही विविध ठिकाणांहून फुले येऊ लागली आहेत. त्यामुळे फूल मार्केटला बहर येताना दिसत आहे. श्रावण व्रतवैकल्यांचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात विविध मंदिरांमध्ये, घरोघरी पूजा-अर्चांचे आयोजन केले जाते. त्यामुळे पूजा साहित्याला मागणी वाढू लागली आहे. त्याबरोबरच फळ-फुलांना पसंती दिली जात आहे. किरकोळ बाजारात हार फुलांची आवक होऊ लागली आहे. श्रावणाला सुरुवात झाल्यापासून होलसेल आणि किरकोळ बाजारात आकर्षक फुलांची रेलचेल पाहावयास मिळत आहे.
मागणी वाढल्याने आवकेतही वाढ-महांतेश मुरगोड, सहसंचालक, बागायत खाते
फूल मार्केटमध्ये दररोज आठ ते दहा टन फुलांची आवक होऊ लागली आहे. श्रावणामुळे मागणी वाढल्याने आवकही वाढत आहे. विशेषत: गुलाब, झेंडू, शेवंती आदी फुलांना मागणी आहे. श्रावण मासापासून फुलांची आवक आणि मागणी वाढत आहे.









