सुधाकर काशीद,कोल्हापूर
देशात 3167 वाघ त्यापैकी महाराष्ट्रात 312 व त्यापैकी कोल्हापूर चांदोली परिसरात आठ पट्टेरी वाघ असल्याने कोल्हापूरची वनसंपदा समृद्ध झाली आहे. एखाद्या परिसरातील वनक्षेत्रात वाघ बिबट्या किती आहेत यावर त्या वनक्षेत्राची संपन्नता कळते. कारण जेथे वाघ बिबट्या आहेत तेथे वन्यजीवांची अन्नसाखळी चांगली आहे असे मानले जाते. देशाच्या तुलनेत वाघांची संख्या 2967 वरून 3167 झाली आहे. तर कोल्हापुरात ही पट्टेरी वाघ आहे की नाही असे वाटण्यासारखे काही वर्षांपूर्वीचे वातावरण बदलून वाघांची संख्या आठ वर आली आहे. बिबट्यांचा वावर तर कोल्हापूर जिह्यातील काही भागात नित्याचाच झाला आहे. हत्तींनी तर आजरा तालुक्यात तळच ठोकला आहे.
कोल्हापूर जिह्यात राधानगरी, दाजीपूर, चंदगड , तिलारी, गगनबावडा, आजरा, आंबा, विशाळगड, पाटगाव ,पन्हाळा येथे जंगल डोंगर कपाऱ्यात पाणीसाठा असल्याने तेथे वन्य प्राण्यांचा वावर आहे. विशेषत: दाजीपूर, राधानगरी ,चांदोली, चंदगड परिसरात पट्टेरी वाघांचे दर्शन अधूनमधून होत होते. पण ते वाघ भ्रमंती करणारे म्हणजे भक्षाच्या शोधात ये -जा करणारे होते. त्यामुळे त्यांचे केवळ अस्तित्व नोंदवले जात होते.
गेल्या काही महिन्यापासून वाघांच्या गणतीची किंवा निरीक्षणाची मोहीम चालू होती. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व राधानगरी वन्यजीव अभयारण्य या पट्ट्यात विशेषत: वाघांच्या अस्तित्वाच्या खुणा त्यांचे ठसे, विष्ठा, झाडावर त्यांच्या नखांचे ओरखडे ,त्यांनी केलेल्या शिकारीचे अवशेष किंवा त्यांचे क्वचित का होईना कुठेतरी होणारे दर्शन यावर लक्ष ठेवले होते. कर्नाटकातील काळी जंगल ते सह्याद्री व्याघ्र प्रकल्प या पट्ट्यात दाजीपूर, राधानगरी जंगलाचा वाटा वाघांसाठी खूप पूरक ठरला. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाद्वारे तर वाघांच्या संवर्धनासाठीच काम सुरू होते.
यावर्षी देशातील टायगर प्रोजेक्ट या प्रकल्पाला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. भारतात वाघांचे अस्तित्व राहील की नाही अशा परिस्थितीत वाघांचा बचाव व संवर्धन यासाठी टायगर प्रोजेक्ट सुरू करण्यात आला. त्यावेळी त्यावरचा खर्च जंगला शेजारच्या गावावरती लादलेले काही निर्बंध त्यामुळे या प्रोजेक्टवर खूप टीका झाली. पण आता पन्नास वर्षानंतर त्याचे चांगले परिणाम दिसून आले व वाघांची संख्या 3167 वर जाऊन पोहोचली.
कोल्हापूर जिह्यात वनक्षेत्र मोठे आहे. जिह्याचा राधानगरी, भुदरगड ,पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा हा भाग वनसंपदेमुळे हिरवागार आहे. वन्यजीवांसाठी खाद्य व पाण्याची मुबलक सुविधा आहे. लोकांचा त्रास कमी करण्यासाठी जंगलाला लागून असलेल्या राधानगरी, दाजीपूर येथील काही गावांचे स्थलांतर करण्यात आले आहे. त्यामुळे वन्यजीवांना मुबलक असे शांत क्षेत्र उपलब्ध झाले आहे. विशेषत: कोल्हापूर जिह्यात राधानगरी, दाजीपूर, चंदगड, चांदोली परिसरात पट्टेरी वाघांचे अस्तित्व आहे. आता ते अधिकृत व्याघ्र गणतीमुळे आठ असल्याचे स्पष्ट झाले आहे.
वाघांची संख्या आणखी वाढेल…
कोल्हापूर जिह्यात आठ पट्टेरी वाघांचा वावर आहे. त्यांची भ्रमंती तिलारी ते चांदोलीपर्यंत आहे. वाघांना पूरक असे वातावरण जंगल क्षेत्रात राहण्यासाठी खूप चांगले प्रयत्न वन विभागामार्फत सुरू आहेत. आता वाघांची संख्या आठ आहे. या संख्येत नक्की आणखी वाढ दिसेल.
एन एस लडकत. क्षेत्र संचालक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प.
Previous Article‘दक्षिण’साठी उमेदवारांच्या मुलाखती
Next Article जी20 मुळे जुने गोवेच्या सौंदर्याला झळाळी









