प्रतिनिधी/ बेंगळूर
तलावात पोहायला गेलेल्या तीन बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना यादगिरी जिल्ह्याच्या सुरपूर तालुक्यातील नगनूर येथे मंगळवारी घडली. तर हनुमान जयंतीनिमित्त कृष्णा नदीतून पाणी आणण्यासाठी जाणाऱ्यांवर बोलेरो वाहन धावून गेल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. रायचूर जिल्ह्याच्या शक्तीनगरजवळ मंगळवारी पहाटे ही दुर्घटना घडली. याचबरोबर हासन जिल्ह्याच्या चन्नरायपट्टण तालुक्यातील बेडगनहळ्ळी सर्कलजवळ परिवहन बसने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
हैयाळप्पा (वय 11), शरणबसव (वय 10, दोघेही रा. नगनूर) आणि अनिल (वय 10, रा. खानापूर) अशी बुडून मृत्यू झालेल्या बालकांची नावे आहेत. स्थानिकांच्या मदतीने तिन्ही बालकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या घटनेची नोंद केंभावी पोलीस स्थानकात झाली आहे.
अय्यनगौडा (वय 29), महेश (वय 24) आणि उदयकुमार (वय 30, तिघेही रा. हेग्गसनहळ्ळी, जि. रायचूर) अशी मृतांची नावे आहेत. घटनेतील जखमींपैकी एकाला रिम्स रुग्णालयात तर आणखी एकाला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बोलेरो वाहन चालकाचा निष्काळजीपणा आणि वेगामुळे हा अपघात झाला आहे. घटनास्थळी शक्तीनगर पोलिसांनी भेट पाहणी पंचनामा केला.
बेंगळूरहून येणाऱ्या दुचाकीला बसने मागून धडक दिल्याने दुचाकीवरील दोघांचा जीव गेला आहे. या अपघातानंतर केएसआरटीसी बसला आग लागल्याने चालकाने बस रस्त्यावरच थांबवली आणि प्रवासी बसमधून खाली उतरले. त्यानंतर संपूर्ण बसने पेट घेतला. सुदैवाने बसमधील प्रवासी सुखरुप बचावले आहे. याची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला. चन्नरायपट्टन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.









