शहर-परिसरात मटका अड्ड्यांवर छाप्यांचे सत्र : मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त
बेळगाव : बेळगाव शहर व तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील मटका अड्ड्यांवर छापे टाकून आठ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याजवळून 7 हजार 70 रुपये रोख रक्कम व मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. शनिवार दि. 14 जून रोजी कॅम्पच्या पोलीस उपनिरीक्षक रुक्मिणी व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रसन्न हनुमंत उप्पार (वय 46) राहणार तेलगू कॉलनी, कॅम्प याला मटका घेताना अटक केली आहे. त्याच्याजवळून 2 हजार 300 रुपये रोख रक्कम व मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या आहेत. कॅम्प येथील हाजा पीर रोडवर ही कारवाई करण्यात आली असून कॅम्प पोलीस स्थानकात त्या मटका बुकीवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई बेळगाव ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांनी काळ्यानट्टी-रंगदोळी रोडवर वाघवडेजवळ पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून 2 हजार 470 रुपये रोख रक्कम, पाच मोबाईल, एक स्प्लेंडर प्लस मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. यामध्ये मटका बुकींबरोबरच खेळणाऱ्यांचाही समावेश आहे. राजू बाबू शिंदे, राहणार वाघवडे याच्यावरही एफआयआर दाखल झाला आहे. शाम लक्ष्मण मुत्यानट्टी, राहणार तीर्थकुंडये, किरण सोमनाथ केंगेन्नावर, राहणार बामणवाडी, परशुराम बाबू देसूरकर, नामदेव यशवंत कर्लेकर, नागाप्पा लक्ष्मण बुड्री तिघेही राहणार संतिबस्तवाड अशी त्यांची नावे आहेत. या सर्व पाच जणांविरुद्ध बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मारिहाळचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर सी. व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुळेभावी येथे दोघा मटका बुकींना अटक केली आहे. अर्जुन फकिराप्पा गडगी, राजू फकिराप्पा गडगी दोघेही राहणार सुळेभावी अशी त्यांची नावे असून त्यांच्याजवळून 2 हजार 300 रुपये रोख रक्कम व मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या आहेत.
मुख्य संशयितांना खुली सूट का?
पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गैरधंद्यांविरुद्ध कारवाई तीव्र केली आहे. आयुक्तांनी आपल्या अधिकाऱ्यांना गैरधंदे बंद झाले पाहिजेत, अशी सक्त सूचनाच केली आहे. त्यामुळे बहुतेक पोलीस स्थानकात रोज छापेमारी सुरू आहे. केवळ छोट्या बुकींना पकडण्यात येत आहे. संपूर्ण बेळगावच्या मटका व जुगारावर ज्यांचे नियंत्रण आहे त्या मुख्य संशयितांना खुली सूट का देण्यात आली आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.









