अन्नभाग्य रोख रकमेची अंमलबजावणी : 46 कोटी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा
प्रतिनिधी/ बेळगाव
सरकारने पाच गॅरंटी योजना लागू केल्या आहेत. त्यापैकी अन्नभाग्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांना रोख रक्कम वितरित केली जात आहे. जिल्ह्यातील 8,29,001 कुटुंब प्रमुखांच्या बँक खात्यात तब्बल 46 कोटी 54 लाख 18 हजार 520 रुपये थेट जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा खात्याने दिली आहे.
सरकारने निवडणुकीदरम्यान बीपीएल आणि अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना 10 किलो तांदूळ देण्याची घोषणा केली होती. मात्र सरकारकडे तांदूळसाठा उपलब्ध नसल्याने तांदळाऐवजी प्रतिव्यक्ती 170 रुपये देण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना 5 किलो तांदळाबरोबरच प्रतिव्यक्ती 170 रुपये मिळणार आहेत. ही रक्कम थेट कुटुंब प्रमुखांच्या बँक खात्यात जमा केली जात आहे.
जिल्ह्यात 11 लाख 49 हजार 501 लाभार्थी आहेत. मात्र यापैकी 1 लाख 40 हजार लाभार्थ्यांची बँक खाती निष्क्रिय आहेत. त्यामुळे बँक खात्यात पैसे जमा करताना अडचणी येऊ लागल्या आहेत. ज्या लाभार्थ्यांची बँक खाती बंद आहेत, ई-केवायसी केलेली नाही आणि इतर समस्या आहेत, त्या लाभार्थ्यांची यादी संबंधित रेशन दुकानदारांना देण्यात आली आहे. रेशन दुकानदारांनी लाभार्थ्यांना सूचना करणे आवश्यक आहे.
अन्नभाग्य योजनेंतर्गत प्रत्येक सदस्याला पाच किलो तांदूळ आणि त्याचबरोबर प्रतिव्यक्ती 34 रुपयांप्रमाणे 170 रुपये दिले जात आहेत. ही योजना पारदर्शकपणे चालण्यासाठी रोख रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जात आहे. त्यामुळे जुलैपासून लाभार्थ्यांना धान्याबरोबरच रोख रक्कमही मिळू लागली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
काही लाभार्थ्यांची बँक खाती निष्क्रिय
जिल्ह्यात अन्नभाग्य योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांची संख्या मोठी आहे. मात्र एक लाखाहून अधिक लाभार्थ्यांची बँक खाती निष्क्रिय असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अन्नभाग्य योजनेची रक्कम जमा करताना अडचणी येऊ लागल्या आहेत. ज्या लाभार्थ्यांची बँक खाती निष्क्रिय आहेत, किंवा ई-केवायसी केलेली नाही किंवा आधार लिंक नाहीत अशा लाभार्थ्यांनी तातडीने ई-केवायसी करून बँक खाते सुरळीत सुरू करावे, असे आवाहन खात्याने केले आहे.









