कठुआमधील दुर्घटना : राज्यात इतरत्रही पावसामुळे हाहाकार
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिह्यात पर्वतीय भागात अचानक आलेल्या पूर आणि पडझडीच्या घटनांमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला. पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी बचाव मोहीम राबवली. कठुआ जिह्यात मुसळधार पावसामुळे अर्धा डझनहून अधिक घरे कोसळून आठ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. तसेच इतर काही भागात घडलेल्या नैसर्गिक आपत्तींमध्ये काहीजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. कठुआचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक शिवदीप सिंह जामवाल यांच्या देखरेखीखाली बाधित गावांमध्ये बचावकार्य सुरू आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मैदानी भागात पूर आणि डोंगराळ भागात भूस्खलनाचे प्रमाण खूप वाढले आहे. डोंगराला तडे गेल्याने अनेक रस्ते बंद झाले आहेत. उत्तराखंड, हिमाचल, जम्मू-काश्मीर या डोंगराळ राज्यांतील अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. येथे लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता जम्मू-काश्मीरमधून भूस्खलनाची मोठी घटना समोर आली आहे. जिथे पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमध्ये 8 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. भूस्खलनाच्या घटनेनंतर घटनास्थळी मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. मात्र, खराब हवामानामुळे मदतकार्यात अडचणी येत आहेत.
कठुआ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथे पूर आणि भूस्खलनामुळे अनेक लोक प्रभावित झाले आहेत. बऱ्याच घरांचे नुकसान झाले आहे. सध्या पूर आणि भूस्खलनामुळे बाधित झालेल्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. पावसामुळे कठुआमधील बहुतांश नद्यांना पूर आला आहे. अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कठुआ आणि सांबा जिह्यात नद्या आणि नाले पूर इशारा पातळीच्या जवळ किंवा वर पोहोचले आहेत.