टायर फुटल्याने अनियंत्रित बस कारवर कोसळली
वृत्तसंस्था/जयपूर
जयपूरमधील दुडू येथे टायर फुटल्याने रोडवेज बस अनियंत्रित होऊन कारवर कोसळली. या भीषण रस्ते अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. तसेच 6 जण जखमी झाले. जयपूर-अजमेर महामार्गावरील मुखमपुरा येथे गुरुवारी दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अनियंत्रित बस पलटी होऊन कारवर कोसळल्यामुळे इको कारचा चेंदामेंदा झाला. जेसीबीच्या सहाय्याने दोन्ही वाहने हटविल्यानंतर कारमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले. इको कारमधील सर्व आठही जण भिलवाडा येथील रहिवासी होते. ते महाकुंभमेळ्यानिमित्त प्रयागराजला जात होते. अपघातात सर्वांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात बसमधील सहा जण जखमी झाले आहेत, असे जयपूर ग्रामीणचे एसपी आनंद कुमार शर्मा यांनी सांगितले. अजमेर महामार्गावर मुखमपुराजवळ रोडवेज बसचा टायर फुटल्यामुळे बस नियंत्रणाबाहेर गेली. त्यानंतर दुभाजक तोडत समोरून येणाऱ्या इको कारशी धडकली. त्यानंतर अनियंत्रित बस दुभाजक ओलांडून दुसऱ्या लेनमध्ये गेल्यामुळे दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून पुढील तपास सुरू आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रशासनाने मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.









