भारतात ईदचा चंद्र दिसला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशभरात आज, सोमवार 31 मार्च रोजी रमजान ईद साजरी केली जाणार आहे. लखनौमध्ये ईदचा चंद्र दिसल्याची घोषणा रविवारी सायंकाळनंतर ईदगाह इमाम मरकझी चांद कमिटीचे अध्यक्ष खालिद रशीद फरंगी यांनी केली. ईदचा चंद्र दिसल्यामुळे भारतात सोमवारी ईद साजरी केली जाईल असे त्यांनी जाहीर केले. यापूर्वी 29 मार्च रोजी सौदी अरेबियात ईदचा चंद्र दिसला होता.
अखिल भारतीय मुस्लीम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी ईदगाह आणि मशिदीच्या इमामांना विशेष आवाहन केले आहे. ईदच्या निमित्ताने रस्ते आणि चौकात नमाज अदा करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. नमाज अदा करताना रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या लोकांना कोणतीही अडचण येणार नाही. वाहतूक कोंडी होणार नाही. दैनंदिन दिनचर्या सुरळीत सुरू राहील. कोणालाही कोणतीही समस्या किंवा त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी असे ते म्हणाले.









