16 ऐवजी 22 सप्टेंबरला होणार
बेळगाव : ईद-ए-मिलादची मिरवणूक बेळगावात आठवडाभर पुढे ढकलण्यात आली आहे. सोमवार दि. 16 सप्टेंबर ऐवजी रविवार दि. 22 सप्टेंबर रोजी मिरवणूक होणार आहे. शुक्रवारी अंजुमन हॉल येथे झालेल्या बैठकीत समाजातील प्रमुख नेते व धर्मगुरुंनी हा निर्णय घेतला आहे. अनेक धर्मगुरुंनी भाग घेतलेल्या बैठकीत ईद-ए-मिलादची मिरवणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबरोबरच 22 सप्टेंबर रोजी होणाऱ्या मिरवणुकीत डीजेला पूर्णपणे फाटा देण्याचा निर्णय झाला आहे.
बैठकीनंतर आमदार व धर्मगुरुंनी यासंबंधी माहिती दिली. सिरत कमिटी, अंजुमन इस्लामसह या बैठकीत बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ, मुक्ती मंजूरअहमद रिझवी, हाफिज नजीरुल्ला खाद्री, सरदारअहमद, मुस्ताक नईमअहमद यांच्यासह अनेक धर्मगुरु व समाजाच्या प्रमुखांनी भाग घेतला होता. बैठकीनंतर आमदार राजू सेठ यांनी मिरवणूक पुढे ढकलल्याची घोषणा केली आहे. ईदच्या एक दिवसानंतर श्री विसर्जन मिरवणूक होणार आहे. एक दिवसाआड होणाऱ्या दोन मिरवणुकांमुळे साहजिकच प्रशासन व पोलीस यंत्रणेवर ताण पडतो. या सर्व गोष्टींचा विचार करून मिरवणूक पुढे ढकलण्यात आली आहे.









