हुपरी(वार्ताहर)
Eid Celebration : हुपरी आणि परिसरातील मुस्लिम बांधवांनी सर्वांना शांतीचा संदेश देत मेघराजना बरसण्यासाठी आराधना केली. आम्ही सर्व एक होऊन सर्व धर्मीय मानवी जीवनाचा सन्मान आणि गौरव करणारा पावित्रमय संदेश दिला.स्वातंत्र्य,समता,न्याय, बंधुता बरोबरच कल्याणकारी जीवन घडो अशी प्रार्थना करत उल अजहाची नमाज पठण मौलवी अब्दुल रहीम मुर्तुसाब शेख यांच्या कर्वे करण्यात आली .
दरम्यान, बकरी ईद हा सण असताना सर्व मुस्लिम बांधवांनी चालू वर्षी आषाढी एकादशी व बकरी ईदचा सण गुरूवारी २९ रोजी एकाच दिवशी आले असून हा योगायोग आहे.त्या दिवशी आषाढी एकादशीचे पावित्र्य जपत बकरी ईद असूनही ‘कुर्बानी’ न देण्याचा कौतुकास्पद निर्णय हुपरी, पट्टणकोडोली ,रेंदाळसह इतर गावातील मुस्लिम समाजाच्या बांधवांनी घेतला आहे. या निर्णयामुळे एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंत या उतीप्रमाणे जाती-धर्मातील सलोखा, श्रध्दा व परंपरेचा सन्मान होत असल्याचे चित्र दिसत आहे.
यावर्षी गुरुवार २९ जून रोजी आषाढी एकादशी व बकरी ईद सण एकाच दिवशी आले आहेत. बकरी ईद दिवशी मुस्लिम बांधव बकऱ्यांची कुर्बानी करतात.मात्र,आषाढी एकादशी असल्याने या दिवशी कुर्बानी करणे योग्य नाही.या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी नियमाप्रमाणे नमाज पठण करुन ईद साजरी करुन शुक्रवारी कुर्बानी करायची असा निर्णय घेण्यात आला आहे.मुस्लिम समाजाचा हा निर्णय बंधुभाव जोपासणारा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
मानवतेची, माणुसकीची प्रतिष्ठापना करून मानवी जीवनाचा सन्मान आणि गौरव करणारी नीती म्हणजे धर्म होय. इस्लाम शांती आणि सन्मान प्रदान करणारा धर्म आहे. याविषयीचे तत्त्वज्ञान व विवेचन आपणास कुराण,हदीस,चालीरीती व रूढी-परंपरा यातून अभ्यासायला मिळते.इतरांप्रति प्रेम,सहानुभूती,दयाभाव व सौहार्द मानवी जीवनाचा पाया आहे. याचा मार्ग मात्र समाजासाठी त्याग,सेवा,समर्पण व बलिदानाच्या वाटेवरून जातो. सत्य, न्याय, नैतिकतेचे आचरण माणसाला उच्च व उन्नत दर्जापर्यंत नेतो.यासाठी समाजाप्रति प्रेम,आपुलकी,दया,करुणा हवी.त्याचबरोबर माणसांमध्ये खऱ्याअर्थाने त्याग,सेवा, समर्पण व बलिदानाची भावना रुजवणे अत्यंत जरुरीचे असल्याचे यावेळी मुस्लिम बांधवाणी म्हटले.