ईदगाह मैदानासह अन्य मैदानांवर मुस्लीम बांधवांनी केले नमाज पठण : मौलानांनी दिला सलोख्याने राहण्याचा संदेश
प्रतिनिधी /बेळगाव
ठिकठिकाणी नमाज पठण, ईद मुबारक आणि शिरखुर्म्याची देवाण-घेवाण, ईद उल फित्र प्रथेचे पालन करत मुस्लीम समाजाने मोठय़ा उत्साहाने ईद साजरी केली. कोरोनाने गेली दोनवर्षे सामूहिक नमाज पठणासह ईद साजरी करण्यावर बंधन आणले होते. यंदा मात्र कोरोनामुक्त वातावरण असल्याने मुस्लीम बांधवांनी उत्साहात ईद साजरी केली.
शहरामध्ये गेल्या महिनाभर मुस्लीम बांधवांनी रोजे पाळले. ईदचा चाँद दिसल्यानंतर रोजे समाप्त होऊन रमजान ईद सणाला सुरुवात झाली. मंगळवारी सकाळी अंजुमन इस्लामनजीकच्या ईदगाह मैदान तसेच अन्य मैदानांवर मुस्लीम बांधवांनी नमाज पठण केले. तर शहरातील मशिदींमध्ये मौलानांनी बांधवांना संदेश दिले.
ईदगाह मैदानावर मौलवी मुफ्ती अब्दुल काझी यांनी कोरोनामुक्त वातावरणात ईद साजरी होत असून आता प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, तसेच भेदाभेद कमी करून सलोख्याच्या वातावरणात रहावे, असा संदेश दिला. नमाजला जाण्यापूर्वी ईद-उल-फित्र प्रथा पूर्ण करण्यात आली. रमजान काळात जकात देण्यात आली. ईद दिवशी ईद-उल्ल-फित्र समाजातील गरीब कुटुंबांना ईद साजरी करता यावी यासाठी त्यांना ठराविक रक्कम व शिधा देण्यात आला.
नमाज पठण केल्यानंतर परस्परांना शुभेच्छा देण्यात आल्या. अनेक हिंदू बांधवांनी मुसलमान बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तर मुस्लीम कुटुंबीयांनी आपल्या मित्र परिवारांना शिरखुर्मा पोहोचविला. सायंकाळी बहुसंख्य कुटुंबांतील सदस्य खरेदीसाठी बाहेर पडले. त्यामुळे दरबार गल्ली, खंजर गल्ली, भेंडीबाजार येथील रस्ते फुलून गेले होते. मशिदींच्या प्रवेशद्वाराबाहेर छोटय़ा विपेत्यांनी खेळणी तसेच अन्य साहित्याचे स्टॉल मांडले होते. दोन वर्षांनंतर हाती पैसे खुळखुळल्याने त्यांनीही आनंद व्यक्त केला.









