प्रजासत्ताक दिन संचलनात असणार मुख्य अतिथी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतह अल-सिसी मंगळवारी संध्याकाळी नवी दिल्लीत पोहोचले आहेत. दिल्ली विमानतळावर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. इजिप्तचे अध्यक्ष अल-सिसी हे प्रजासत्ताक दिन संचलन सोहळय़ात मुख्य अतिथी म्हणून सामील होणार आहेत. स्वतःच्या दौऱयादरम्यान सिसी हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विदेशमंत्री डॉ. एस. जयशंकर यांची भेट घेत चर्चा करणार आहेत.
सिसी यांच्यासोबत 24-27 जानेवारी या कालावधीतील अधिकृत दौऱयासाठी 5 मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱयांचे एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ भारतात दाखल झाले आहे. अब्देल फतह अल-सिसी नवी दिल्लीत पोहोचताच त्यांच्या स्वागतासाठी पारंपरिक लोकनृत्य सादर करण्यात आले. इजिप्तच्या अध्यक्षांना प्रजासत्ताक दिनी मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारताने स्वतःच्या जी-20 अध्यक्षत्वादरम्यान इजिप्तला ‘अतिथी देश’ म्हणूनही आमंत्रित केले आहे.
राष्ट्रपती भवनात अब्देल फतह अल-सिसी यांचे बुधवारी स्वागत केले जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विदेशमंत्री एस. जयशंकर यांच्यासह अन्य महनीयांची सिसी हे भेट घेणार आहेत. तसेच राजघाट येथे जात महात्मा गांधी यांना पुष्पांजली अर्पण करणार आहेत.
इजिप्तचे अध्यक्ष सिसी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत द्विपक्षीय बैठक करणार असून यात परस्पर हिताच्या द्विपक्षीय, क्षेत्रीय आणि जागतिक मुद्दय़ांवर चर्चा होणार आहे. तर बुधवारी संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून सिसी यांच्या सन्मानार्थ प्रीतिभोजनाचे आयोजन केले जाणार आहे. प्रजासत्ताक दिनी मुख्य अतिथी म्हणून सिसी हे संचलन पाहतील. इजिप्तच्या सैन्याची एक तुकडी देखील राजपथावरील संचलनात भाग घेणार आहे.
अल-सिसी यांच्या दौऱयादरम्यान दोन्ही देशांमध्ये कृषी, सायबर सुरक्षा, माहिती-तंत्रज्ञानासह अन्य क्षेत्रांकरता अनेक करार होण्याची शक्यता आहे. अल-सिसी हे भारतीय उद्योजकांसोबत संवाद साधणार आहेत. तसेच दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य वृद्धींगत करण्याच्या दिशेने पावले उचलली जाण्याची शक्यता आहे.









