ऑर्डर ऑफ द नाईल’ पुरस्कार : द्विपक्षीय सामंजस्य करारांवरही स्वाक्षऱ्या काहिरा : राष्ट्राध्यक्ष अल-सिसी यांच्या हस्ते पंतप्रधान मोदी यांना ‘ऑर्डर ऑफ द नाईल’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

वृत्तसंस्था /काहिरा
अमेरिकेचा यशस्वी दौरा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी दोन दिवसांच्या इजिप्त दौऱ्यावर पोहोचले. या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी त्यांना राजधानी काहिरामध्ये इजिप्तचा सर्वोच्च राज्य सन्मान प्रदान करण्यात आला. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांनी पंतप्रधान मोदींना ‘ऑर्डर ऑफ द नाईल’ पुरस्काराने सन्मानित केले. तसेच अन्य अनेक कार्यक्रमांमध्येही भाग घेत पंतप्रधानांनी इजिप्तच्या दोन दिवशीय दौऱ्यातून द्विपक्षीय संबंधांना अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले. ‘ऑर्डर ऑफ द नाईल’ हा इजिप्तचा सर्वोच्च राज्य सन्मान आहे. द्विपक्षीय बैठकीपूर्वी इजिप्तच्या राष्ट्रपतींनी पंतप्रधान मोदींना प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित केले. गेल्या 9 वर्षांत जगभरातील विविध देशांनी पंतप्रधान मोदींना दिलेला हा 13वा सर्वोच्च राज्य सन्मान आहे. दोन्ही नेत्यांनी या भेटीदरम्यान एका महत्त्वाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कैरो येथील हेलिओपोलीस वॉर मेमोरियलला (युद्धस्मारक) भेट दिली आणि पहिल्या महायुद्धात सर्वोच्च बलिदान दिलेल्या भारतीय सैनिकांना श्र्रद्धांजली वाहिली. हेलिओपोलीस हुतात्मा स्मारकाला भेट दिल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी इजिप्तचे राष्ट्रपती अब्दुल फताह अल-सिसी यांची इजिप्शियन प्रेसीडेंसी येथे भेट घेतली. यानंतर दोन्ही नेत्यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करून संयुक्त पत्रकार परिषदेलाही संबोधित केले.
महत्त्वाचे करार पूर्णत्वास

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विट करून इजिप्तसोबत झालेल्या करारांची माहिती दिली आहे. तसेच इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांच्याशी फलदायी बैठक झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा, नूतनीकरणक्षम ऊर्जा, सांस्कृतिक आणि जनसंपर्क यासह दोन्ही देशांमधील भागिदारी अधिक दृढ करण्याच्या मार्गांवर नेत्यांनी चर्चा केली. यादरम्यान द्विपक्षीय संबंधांना ‘स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’पर्यंत नेण्यासाठी करार करण्यात आला. कृषी, पुरातत्व आणि पुरातन वास्तू आणि स्पर्धा कायदा या क्षेत्रातही 3 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
अल-हकीम मशिदीला भेट

पंतप्रधानांनी काहिरा येथील देशातील 11 व्या शतकातील अल-हकीम मशिदीला भेट दिली. ही मशीद भारतातील दाऊदी बोहरा समुदायाच्या मदतीने पुनर्संचयित करण्यात आली आहे. या मशिदीचे नूतनीकरण बोहरा समाजाने केल्यानंतर 1980 मध्ये नवीन स्वरूपात दिसत आहे. या मशिदीच्या नवनिर्माणाची जबाबदारी दाऊदी बोहरा समाजाचे 52 वे मौलवी सय्यदना मोहम्मद बुरहानुद्दीन यांनी घेतली होती. मोहम्मद बुरहानुद्दीन हे भारताशी संबंधित आहेत.
भारतीय समुदायाशी संवाद

इजिप्त दौऱ्याचा एक भाग म्हणून पंतप्रधान मोदींनी रविवारी भारतीय समुदायाशी संवाद साधला. यावेळी त्यांना भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी कार्यरत राहण्याचा सल्ला देत त्यांच्यासोबत छायाचित्रेही क्लिक केली.









