► प्रतिनिधी/ बेळगाव
किरकोळ भाजीपाला बाजारात वांगी, शेवग्याच्या शेंगा आणि कांद्या वधारला आहे. विशेषत: मागील आठवड्यात 20 ते 25 रुपये असणारा कांदा 60 रु. प्रति किलो झाला आहे. त्यामुळे कांद्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. त्याबरोबर वांग्याचा दर देखील वाढू लागला आहे. नवरात्रोत्सवामुळे भाजीपाला तेजीत असला तरी काही भाज्यांचे दर चढे तर काही भाज्यांचे दर स्थिर असल्याचे दिसत आहे.
शनिवारच्या आठवडी बाजारात बटाटा 20 ते 30 रुपये किलो, कांदे 60 रु. किलो, फ्लावर 20 रुपये, काकडी 60 रुपये, ढबू 50 रुपये, शेवग्याच्या शेंगा 30 रुपये पेंढी, गाजर 60 रु. किलो, भेंडी 20, वांगी 50 रु. किलो, ओली मिरची 60 रु., टोमॅटो 15 रुपये किलो, कोथिंबीर 10 रुपये पेंढी, कारली 50 रुपये किलो, दोडकी 40 रुपये किलो, गवार 60 रुपये किलो, कोबी 20 रुपये एक, कांदापात 20 रुपये चार पेंढ्या, लालभाजी 15 रुपये एक पेंढी, पालक 10 रुपयाला दोन पेंढी, मेथी 20 रुपयाला एक पेंढी, शेपू 20 रुपयाला एक पेंढी असा भाजीपाल्याचा दर आहे.
मागील आठवड्याच्या तुलनेत भेंडीचा दर कमी झाला आहे. टोमॅटो दर घसरलेलाच आहे. पालेभाज्यांचे दर हळुहळू वाढू लागले आहेत. मेथी, पालक, शेपू आणि लालभाजीच्या दरात वाढ होत आहे. नवरात्रोत्सवामुळे बाजारात विविध फळांचीही आवक वाढू लागली आहे. सफरचंद, संत्री, पेरु, सीताफळ, नारळ आदींची मागणी वाढली आहे. त्याबरोबर हार, फुलांची रेलचेल पहावयास मिळत आहे.
दसरोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपल्याने बाजारात विविध साहित्यांची खरेदी होवू लागली आहे. पूजेच्या साहित्याबरोबर भाजीपाला आणि किराणा साहित्यालाही पसंती मिळू लागली आहे. शनिवारी आठवडी बाजारादिवशी नागरिकांनी विविध साहित्याची खरेदी केली. दसरा उत्सवासाठी सोमवारी बाजारात पूजेचे साहित्य आणि इतर साहित्यासाठी गर्दी वाढेल, असा विश्वासही विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे.









