पंतप्रधान मोदी यांचे जी-7 परिषदेत झेलेन्स्की यांच्याकडे प्रतिपादन, चीनलाही गर्भित इशारा
► वृत्तसंस्था/ टोकियो
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबविण्यासाठी शक्य तितके सर्व प्रयत्न करु, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ते शनिवारी येथे जी-7 परिषदेत भाग घेण्यासाठी पोहचले. त्यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांची भेट घेतली. ही भेट दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने अणुबाँब टाकलेल्या हिरोशिमा येथे झाली. दोन्ही नेत्यांनी काहीकाळ चर्चाही केली. युद्धाला प्रारंभ झाल्यापासून दोन्ही नेते प्रथमच एकमेकांना प्रत्यक्ष भेटले.
त्याआधी पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन यांचीही गळाभेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली नाही. ती नंतर होण्याची शक्यता आहे. मात्र, या त्यांच्या गळाभेटीने भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांच्या दृढतेचे दर्शन साऱ्या जगाला झाले, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
भारत शांततेचा समर्थक
मतभेद दूर करण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच मार्ग आहे. भारत सामोपचाराचा मार्ग आणि शांतता यांचा समर्थक आहे, असे वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी झालेल्या भेटीआधी जपानच्या योमिरी शिंबुन या वृत्तसंस्थेशी बोलताना केले. युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही शक्य तितके प्रयत्न करु. युक्रेनच्या वादावर शांततामय मार्गाने तोडगा निघावा, अशी भारताची इच्छा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
चीनलाही अप्रत्यक्ष इशारा
सर्व सामायिक समुद्री क्षेत्रांमध्ये सर्व देशांना मुक्त हालचाल करता यावी. प्रत्येक देशाच्या सार्वभौमत्वाचे आणि अखंडतेचे संरक्षण व्हावे. तसेच समुद्री क्षेत्रांसंबंधीचे वाद चर्चेच्या आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या माध्यमातून सुटावेत, अशी भारताची इच्छा आहे. भारत त्यासाठी प्रयत्नशील आहे, असे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले. हा चीनला अप्रत्यक्ष पण ठोस इशारा मानला जात आहे. हिरोशिमा येथे त्यांच्या हस्ते महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. चीनकडून होत असलेल्या तैवानच्या गळचेपीसंबंधी, तसेच त्याच्या भारत-प्रशांतीय सागरी क्षेत्रातील आक्रमकतेविषयी त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता.
चीनकडून परिषदेच्या अपेक्षा
युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी चीनने रशियावर दबाव आणावा. तसेच तैवानचे सार्वभौमत्व आणि त्याची सद्य:स्थिती यांचा चीनने मान राखावा, अशी अपेक्षा जी-7 परिषदेत सहभागी झालेल्या देशांनी चीनकडून व्यक्त केली आहे. चीन या परिषदेचा सदस्य नाही. त्यामुळे त्याचा प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित नव्हता. मात्र, या परिषदेचे सदस्य असणाऱ्या अमेरिका, जपान, जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स, इटली आणि कॅनडा या देशांनी चीनला असे आवाहन केले आहे.
2024 मध्ये ‘क्वाड’ भारतात
जपानच्या हिरोशिमा शहरात शनिवारी क्वाड संघटनेची परिषद झाली आहे. या संघटनेत अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे चार देश या संघटनेचे सदस्य आहेत. ही परिषद सागरी क्षेत्रांच्या मुक्ततेच्या सुरक्षेसाठी स्थापन करण्यात आली आहे. या परिषदेची बैठक ऑस्टेलियात होणार होती. तथापि, अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन यांनी ऑस्ट्रेलियाचा दौरा रद्द केल्याने ती रद्द करण्यात आली. पण जी-7 परिषदेच्या निमित्ताने या चारही देशांचे प्रमुख जपानमध्ये आले आहेत. त्यामुळे येथे ही बैठक अनौपचारिकरित्या घेण्यात आली. 2024 ची शिखर परिषद भारतात घेण्याचा निर्णय याच बैठकीत घेण्यात आला आहे.









