जिल्हाधिकाऱ्यांनी साधला पत्रकारांशी संवाद
बेळगाव : बळ्ळारी नाल्याच्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी बोगदा बांधकाम आणि ओव्हरफ्लोसाठी पर्यायी व्यवस्था करण्याची विनंती महामार्ग प्राधिकरणाला करण्यात आली आहे. स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य केल्यास पुढील डिसेंबरपर्यंत बळ्ळारी नाल्याच्या पुनरुज्जीवनासाठी उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. बेळगाव पत्रकार संघाच्यावतीने गुरुवारी झालेल्या संवाद कार्यक्रमात जिल्हाधिकारी बोलत होते. रिंगरोडच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शहरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बाह्या रिंगरोडचे काम अत्यंत आवश्यक आहे. डिसेंबरपर्यंत बायपास रस्त्याचे काम पूर्ण होईल. त्यानंतर जुना राष्ट्रीय महामार्ग-4 हा रस्ता पणजी रस्त्याला जोडण्यात येईल. त्यामुळे धारवाडकडून येणारी वाहने बेळगाव शहराबाहेरून गोवा किंवा कोल्हापूरला जाऊ शकतात.
भीमगड अभयारण्य, चापगाव, तळेवाडी, आमगाव यासारख्या वनक्षेत्रातील नागरिकांनी स्वेच्छेने लोकवसतीत येण्यास तयार असतील तर त्यांना प्रत्येकी 15 लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी रोशन यांनी स्पष्ट केले. तसेच या वनवासी नागरिकांना शिक्षण तसेच आरोग्याच्या सुविधा पुरवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. उत्तर कर्नाटकातील शक्तीपीठ रेणुका मंदिराचा विकास प्राधिकरणाच्या सहकार्याने करण्यात येईल. मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व जपूनच आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. आधुनिक सुविधांमध्ये देवीच्या सुलभ दर्शनाची व्यवस्था, भाविकांना मूलभूत सुविधा, वाहन पार्किंगची व्यवस्था, खुले स्वयंपाक घर, भक्त निवास, तिरुपतीच्या धर्तीवर काऊंटर, ऑनलाईन देणगी व्यवस्था यासारख्यांचा समावेश असेल, असेही जिल्हाधिकारी रोशन यांनी सांगितले.
शेतकरी संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा
बळ्ळारी नाल्यातून पाण्याचा निचरा व्यवस्थितपणे होण्यासाठी 2000 सालापासून बेळगाव शेतकरी संघटनेच्या माध्यमातून प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू होता. बळ्ळारी नाल्याच्या पुनरुज्जीवनाचे काम येत्या डिसेंबरात सुरू करण्यात येईल, असे आश्वासन विद्यमान जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले आहे. लेंडी नाल्याच्या स्वच्छतेचे काम सुरू असून याचे समाधान आहे.
– नारायण सावंत (अध्यक्ष, बेळगाव शेतकरी संघटना)









